DeepSeek Inside Story: आधी चॅटजीपीटी, मग जेमिनी, मग ग्रोक, पण आता डीपसीक आल्यानंतर टेक इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे. चिनी एआय चॅटबॉट डीपसीक अॅपलच्या अॅप स्टोअरमध्ये अव्वल स्थानी आहे आणि अमेरिकेत डाउनलोडमध्ये चॅटजीपीटीलाही मागे टाकलंय. यामुळे गुंतवणूकदारांनाही घाम फुटला असून एका दिवसात अमेरिकेतील दिग्गज टेक दिग्गजांचे १ ट्रिलियन डॉलर्स बुडाले. या डीपसीकमागे नक्की कोणाचं डोकं आहे?
"ओपन एआय हा काही देव नाही आणि नेहमीच आघाडीवर असू शकत नाही," असं वक्तव्य ३९ वर्षीय संस्थापक लियांग यांनी जुलै २०२४ मध्ये चिनी मीडिया आउटलेट ३६ केआरशी बोलताना केलं. त्यानंतर अवघ्या काही महिन्यांत त्यांनी ही किमया करुन दाखवली आहे.
डीपसीक हे केवळ २० महिने जुनं स्टार्टअप आहे, परंतु त्यानं आपल्या एआय असिस्टंटनं जगाचं लक्ष वेधून घेतलंय. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी डीपसीकला शीतयुद्धाच्या काळातील "स्पुटनिक" मोमेंट असं संबोधलं आहे, जे एआयमध्ये नवीन युगाची भविष्यवाणी करतं.
लियांग वेनफेंग कोण?
यामागे डीपसीकचे संस्थापक लियांग वेनफेंग यांचं नाव आहे. लियांग वेनफेंग १९८० च्या दशकात चीनमधील गुआंगडोंग लहानाचे मोठे झाले. त्यांचे वडील प्राथमिक शाळेत शिक्षक होते. चीनमधील सर्वात जुन्या आणि सर्वोत्तम क्रमवारीतील विद्यापीठांपैकी एक असलेल्या झेजियांग विद्यापीठातून त्यांनी पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.
डीपसीकच्या माध्यमातून लियांग यांना चीनला पुढे न्यायचं आहे. "चीनचा एआय कायम फॉलोअरच्या स्थितीत राहू शकत नाही. चीन आणि अमेरिकेत केवळ एक दोन वर्षांचं अंतर आहे असं आपण सातत्यानं ऐकतो. परंतु मुख्य फरक ओरिजनॅलिटी आणि इमिटेशन यांच्यात आहे. जर हे बदलले नाही तर चीन नेहमीच अनुयायी राहील. त्यामुळे काही संशोधन आवश्यकच आहे," असं वेनफेंग म्हणाले.
"जेव्हा ओपन एआयच्या सुरुवातीला गुंतवणूकदारांनी त्यात पैसे गुंतवले, तेव्हा आपल्याला किती रिटर्न मिळेल याचा त्यांनी विचार केला नाही. परंतु वास्तविक त्यांना हे काम करायचं होतं," असंही त्यांनी नमूद केलं.