Join us

सांताक्लॉजच्या पेटाऱ्यातून जीएसटीचे गिफ्ट काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 5:54 AM

या वेळी करदात्यांनाही ख्रिसमसच्या आधीच सरकारकडून भेटवस्तू मिळाल्या. शनिवारी झालेल्या ३१व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत आयटीसी, कर दर, कंपोझिशन स्कीम, रिटर्न दाखल करण्याच्या पद्धती इत्यादींवर निर्णय घेण्यात आले.

- सी. ए. उमेश शर्माअर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, ख्रिसमस येत आहे. ख्रिसमसला सांताक्लॉज लहान मुलांना गिफ्ट, चॉकलेट देतो, तर या ख्रिसमसला जीएसटीमुळे कोणाला काय गिफ्ट मिळेल ?कृष्ण (काल्पनिक पात्र): अर्जुना, होय ख्रिसमस आला आहे. या वेळी करदात्यांनाही ख्रिसमसच्या आधीच सरकारकडून भेटवस्तू मिळाल्या. शनिवारी झालेल्या ३१व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत आयटीसी, कर दर, कंपोझिशन स्कीम, रिटर्न दाखल करण्याच्या पद्धती इत्यादींवर निर्णय घेण्यात आले. त्यामुळे करदात्यांना सांताक्लॉजच्या रूपातील सरकारने ख्रिसमसच्या आधीच गिफ्ट दिलेले आहे.अर्जुन : कृष्णा, जीएसटी परिषदेच्या बैठकीत कोणकोणते निर्णय घेण्यात आले?कृष्ण : अर्जुना, जीएसटी परिषदेच्या बैठकीत पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले.१) आयटीसी : आर्थिक वर्ष २०१७-१८ मधील सुटलेले आयटीसी ३१ मार्च, २०१९ पर्यंत क्लेम करता येतील.२) कंपोझिशन स्कीम : कंपोझिशन स्कीमअंतर्गत लहान सेवा पुरवठादांरासाठी ५ टक्के कर दर लागू करण्यात आला आहे. हा एक मोठा दिलासा आहे.३) कर दरामध्ये बदल : जीएसटी परिषदेने मॉनिटर, टीव्ही, पॉवर बँक बॅटरी, गीअर बॉक्स, व्हिडीओ कॅमेरा आणि रबराचा वापर असलेले टायर यावरील दर २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्याचे ठरविले आहे. त्याचप्रमाणे, सिनेमा तिकिटाचा दर १०० रुपयांपेक्षा कमी असेल, तर १२ टक्के दर आणि १०० रुपयांपेक्षा अधिक असेल, तर १८ टक्के दर आकारण्यात येईल.४) रिटर्न दाखल करण्याची पद्धत : १ एप्रिल, २०१९ पासून रिटर्न दाखल करण्याची नवीन पद्धत अंमलात येईल.५) देय तारखेमध्ये वाढ : ‘जीएसटीआर ९’ व ‘जीएसटीआर ९ सी’ च्या देय तारखांमध्ये वाढ झाली, तसेच आवक पुरवठ्याच्या ‘एचएसएन’ सारांशांसंबंधी स्पष्टीकरण देण्यात येणार आहे.अर्जुन : कृष्णा, करदात्याने यातून काय बोध घ्यावा ? कृष्ण : अर्जुना, सरकारने जीएसटी तरतुदींमध्ये सकारात्मक बदल करून ख्रिसमसचे गिफ्ट दिले आहे. फक्त आता हे सर्व बदल कधी लागू होतील, हेच पहावे लागेल. त्यानुसार, करदात्यांनाही स्वत:ला सज्ज करावे, हाच बोध.

टॅग्स :जीएसटी