लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : चोरीला गेलेले अथवा गायब झालेले ८.९९ लाख मोबाईल फोन दूरसंचार विभागाच्या (डीओटी) ‘सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटी रजिस्टर’ने (सीईआयआर) ट्रॅक केले आहेत. तथापि, हे फोन परत मिळविण्याचे प्रमाण अवघे १५ टक्के असल्याचे समोर आले आहे.
‘सीईआयआर’ची सेवा सुरू झाल्यापासून १६.१३ लाख उपकरणे ब्लॉक करण्यात आली आहेत. अलीकडील काही महिन्यांत चोरीला गेलेले मोबाईल फोन परत मिळविण्याचे (रिकव्हरी) प्रमाण वाढले आहे. तरीही राष्ट्रीय पातळीवर त्याचे प्रमाण १५ टक्क्यांपेक्षा कमीच आहे.
संचार साथी पोर्टलच्या ताज्या आकडेवारीनुसार, चोरीची नोंदणी झालेल्या मोबाईल फोनपैकी केवळ १.३१ लाख फोन परत मिळू शकले आहेत. हे प्रमाण १४.६ टक्केच आहे. सरकारी आकडेवारीनुसार, देशात रोज ५० हजार मोबाईल फोनची चोरी होते. त्यांच्या रिकव्हरीचे प्रमाण वेगवेगळे आहे.
रिकव्हरी सर्वाधिक कुठे?
दिल्लीत सर्वाधिक १.४३ टक्के फोन परत मिळविण्यात यश आले. रिकव्हरी मात्र राज्य पोलिस विभागाद्वारे करण्यात आली. हरवलेले अथवा चोरीला गेलेले फोन ट्रॅक करण्यासाठी अथवा ब्लॉक करण्यासाठी पोर्टल अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. प्रत्यक्ष फोन जप्तीचे काम मात्र पोलिसच करू शकतात.