नवी दिल्ली : आयकर परतावा भरण्याची वाढवलेली अंतिम तारिख उद्या, ३१ ऑगस्ट आहे. मात्र, एक महिन्याची मुदत वाढवून सुद्धा तुम्ही आयकर भरू शकला नसाल तर काही पर्याय उपलब्ध आहेत. या पाहूया आयकर भरण्याची शेवटची तारीख उलटल्यानंतर काय होईल ते...
गेल्या वर्षी म्हणजेच 2017-18 या आर्थिक वर्षामध्ये आयकर भरण्यास उशिर झाला किंवा भरलाच नाही तर कोणताही दंड आकारला जात नव्हता. मात्र, या वर्षी 2018-19 आयकर कायद्यामध्ये 234F हे कलम वाढविण्यात आले आहे. यानुसार ३१ ऑगस्टनंतर कर भरल्यास जास्तीतजास्त 10 हजार रुपयांचा दंड होऊ शकणार आहे. यामध्येही काही स्तर आहेत.
जर 31 ऑगस्ट ते 31 डिसेंबरपर्यंत आयकर भरल्यास 5000 रुपये, १ जानेवारी नंतर कर भरल्यास 10 हजार रुपयांचा दंड होऊ शकणार आहे. तर 5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असल्यास हाच दंड 1000 रुपयांपर्यंत आकारला जाणार आहे.
नोकरी न करणाऱ्या करदात्याने जर उशिराने कर भरला असेल तर त्याला कराच्या रकमेच्या व्याजासह कर भरावा लागणार आहे. तसेच तपासल्यानंतर जर आयकर विभागाने अतिरिक्त कर मागितल्यास त्या रक्कमेवरही व्याज द्यावे लागणार आहे. यामुळे आयकर वेळेवर भरणे फायद्याचे ठरू शकते.
उशिराने आयकर रिटर्न कसा भरावा...आयकर रिटर्न मुदतीत भरण्याची आणि उशिराने भरण्याची प्रक्रिया सारखीच आहे. फरक एवढाच आहे, जेव्हा उशिराने आयकर भरला जातो तेव्हा 'रिटर्न फाईल अंडर 139(4)' निवडा.
सुधार करण्याचा विकल्पही...उशिराने आयकर भरल्यास त्यामध्ये दुरुस्ती करण्याची मुभा असते. आयकर परतावा भरला की निम्मे काम होते. आयकर परतावा भरल्यानंतर 120 दिवसांत त्याची पडताळणीही करायची असते.