Senior Citizen Loan : ज्येष्ठ नागरिकांकडे उत्पन्नाचे कोणतेही ठोस स्त्रोत नसतात, त्यामुळे वयाच्या ६० वर्षांनंतर बँकाज्येष्ठ नागरिकांना कर्ज किंवा क्रेडिट कार्ड वगैरे देणं सहसा टाळतात. पण समजा ज्येष्ठ नागरिकांसमोर अशी परिस्थिती निर्माण झाली की त्यांना पैशांची नितांत गरज आहे आणि कुठूनही काम होत नाही, तर त्यांच्याकडे काय पर्याय असू शकतो? पैशाची गरज कुठून भागवणार? अशा कठीण काळात ज्येष्ठ नागरिकांसाठी कर्जांचे काही प्रकार 'संकटमोचक' ठरू शकतात.
पेन्शन लोन स्कीम - समजा ज्येष्ठ नागरिकांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळत असेल तर त्यांना बँकांमध्ये कर्ज घेण्याचा पर्याय आहे. पीएनबी, एसबीआयसह सर्व बँकांमध्ये पेन्शनधारकांसाठी कर्जाचे पर्याय उपलब्ध आहेत. पीएनबीमध्ये वृद्धांसाठी 'पर्सनल लोन स्कीम फॉर पेन्शनर्स' या नावानं पेन्शन स्कीम चालवली जाते आणि एसबीआयमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया पेन्शन लोन स्कीम या नावाने पेन्शन स्कीम चालवली जाते.
पेन्शन लोनच्या नावाखाली दिलं जाणारं हे कर्ज एक प्रकारचं पर्सनल लोन आहे, ज्याचा वापर ते आपल्या गरजेनुसार करू शकतात. ७५ वर्षापर्यंतचे लोक यासाठी पात्र आहेत. मात्र, त्यासोबत इतरही काही अटी घालण्यात आल्या आहेत.
गोल्ड लोन - सोनं हा दागिना आहे तसाच तो असेटही आहे. जर तुम्हाला अचानक पैशांची गरज भासली तर तुम्ही तुमच्याकडे असलेलं सोनं गहाण ठेवून कर्ज घेऊ शकता. पर्सनल लोन, प्रॉपर्टी लोन, कॉर्पोरेट लोनपेक्षा गोल्ड लोन स्वस्त आहे. कर्जाची रक्कम आपल्या सोन्याच्या मूल्यानुसार दिली जाते. क्रेडिट स्कोअर वगैरेचा यात फारसा फरक पडत नाही. साधारणपणे १८ ते ७५ वर्षे वयोगटातील लोकांना गोल्ड लोन सहज मिळतं.
एफडीवर लोन - ज्येष्ठ नागरिक सहसा एफडीमध्ये गुंतवणूक करतात. ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर कर्ज घ्यायचं असेल तर ते घेऊ शकतात. हे देखील एक सुरक्षित कर्ज आहे जे एफडीच्या रकमेवर अवलंबून असतं. साधारणपणे एफडीच्या रकमेच्या ९० ते ९५ टक्के रक्कम कर्ज म्हणून मिळतं. त्याचा लाभ घेताना बँका तुमची एफडी सिक्युरिटी/गॅरंटी म्हणून गहाण ठेवतात. सर्वसाधारणपणे हे कर्ज पर्सनल लोनपेक्षा स्वस्त असतं. यात एफडीच्या व्याजदरापेक्षा १% ते २% अधिक व्याज आकारलं जातं.
एनबीएफसीकडून कर्ज - जर तुम्हाला बँकेकडून कर्ज मिळत नसेल तर तुम्ही एनबीएफसीकडून कर्ज घेऊ शकता. तुमचा क्रेडिट स्कोअर कमी आणि वय जास्त असलं तरीही एनबीएफसी कर्ज देतात. मात्र, ते बँकेपेक्षा जास्त व्याज आकारतात.