‘आरोग्य विमा हा आता प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्वाचा घटक झाला आहे. दरवर्षी ठरावीक प्रिमियम भरून आरोग्य विमा घेणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. परंतु अनेकदा विमा कंपन्या दरवर्षी लाखोंच्या संख्येने आरोग्य विम्याचे दावे फेटाळून लावतात. अशावेळी दाद मागायची कोणाकडे?
रजिस्टर्ड पोस्टाने माहिती द्या
विमा कंपनीने जर आरोग्य विम्याचा दावा फेटाळून लावला असेल तर त्याचे कारण दिले जाते. परंतु तुमचा दावा योग्य असेल आणि विमा कंपनीने दिलेली कारणे योग्य नसतील तर तुम्ही त्याची माहिती लेखी स्वरूपात देऊन रजिस्टर्ड पोस्टाद्वारे विमा कंपनीला त्यासंदर्भात जाब विचारू शकता.
विमा लोकपालांकडे अशी मागा दाद...
आरोग्य विमा योजनाधारक लोकपालांकडे एका साध्या कागदावर लिहून वा टाइप करून पोस्ट वा ई-मेलद्वारे तक्रार दाखल करू शकतो.
त्यावर योजनाधारकाचे नाव, स्वाक्षरी, विमा योजनेचा क्रमांक, दावा क्रमांक, दाव्याची रक्कम इत्यादी माहिती दिली जाणे अपेक्षित आहे.
पूर्ण पत्ता, फोन नंबर, विमा कंपनीचे नाव, ई-मेल आयडी, हॉस्पिटलचे नाव, डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन इत्यादी पूरक माहितीही जोडली जावी. विम्याचा दावा का फेटाळण्यात आला आहे, याची कारणेही द्यावी लागतील. तसेच तुमचा दावा योग्य का आहे, हेही स्पष्ट करावे लागेल. पत्राची एक प्रत विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (इर्डा) यांनाही पाठवू शकता किंवा त्यांना complaints@irdai.gov.in येथे ई-मेल करू शकता. पत्र वा मेल पाठवल्यानंतर महिनाभरात तुमच्या दाव्याचा परतावा मिळाला नाही तर विमा लोकपालांकडे दाद मागता येते.
हेही लक्षात असू द्या...
विमा लोकपालांकडे तक्रार दाखल करण्यासाठी कोणत्याही खर्चाची आवश्यकता नाही. ग्राहक न्यायालयात दावा प्रलंबित असेल तर
लोकपालांकडे दाद मागता येणार नाही.