भारतात रोजच्या रोज लाखो लोक ट्रेनने प्रवास करतात. यादरम्यान अनेक प्रवाशांचे सामान चोरीला जाते अथवा हरवते. मात्र अनेक प्रवासी याची तक्रारही नोंदवत नाहीत. अनेकांना तर तक्रार कुठे आणि कशी करावी? हेही माहीत नसते. तसेच, तक्रार देऊन तरी काय उपयोग? असेही अनेक प्रवाशांना वाटते. पण त्यांचा हा समज योग्य नाही. कारण रेल्वे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर चोरीला गेलेला अथवा ट्रेनमध्ये विसरलेला माल त्यांच्या मालकांपर्यंत पोहोचवत असते. तर जाणून घेऊयात की, जर ट्रेनमध्ये सामान विसरले, हरवले अथवा चोरीला गेले तर प्रवाशाने काय करायला हवे...?
आरपीएफकडे करा तक्रार -
आपल्याला ज्या स्टेशनवर उतरायचे आहे, त्या स्टेशनवर उतरल्यानंतर अथवा घरी पोहोचल्यानंतर, काही सामान ट्रेनमध्ये राहिल्याचे अथवा चोरीला गेल्याचे समजल्यास, सर्वप्रथम, आपण ज्या स्थानकावर ट्रेनमधून उतरलात त्या स्थानकावर जा आणि तेथील रेल्वे अधिकाऱ्यांना भेटून, आपले सामान ट्रेनमध्येच राहिल्यासंदर्भात माहिती द्या. याच बरोबर रेल्वे पोलीस दलालाही (RPF) यासंदर्भात माहिती द्या. तसेच आपली वस्तू न मिळाल्यास आरपीएफकडे एफआयआर नोंदवा.
चालत्या ट्रेनमधून सामान चोरीला गेल्यास काय कराल? -
आपले सामान चालत्या ट्रेन मधून चोरीला गेल्यास, आपण सर्वप्रथम ट्रेन कंडक्टर कोच अटेंडन्ट, गार्ड अथवा जीआरपी एस्कॉर्टसोबत संपर्क साधायला हवा. यांच्याकडून आपल्याला एफआयआर फॉर्म मिळेल. हा फॉर्म भरल्यानंतर तो आवश्यक त्या कारवाईसाठी आरपीएफ पोलीस ठाण्यात पाठविला जाईल. जर आपल्याला प्रवास पूर्ण करायचा असेल, तर आपण हे तक्रार पत्र कोणत्याही रेल्वे स्थानकावरील RPF मदत पोस्टवरही देऊ शकता.
कसे मिळते सामान? -
आपले हरवलेले सामान सापडल्यास, ते सामान आपण ज्या स्थानकावर तक्रार दाखल केली आहे तेथे पोहोचवले जाते. यानंतर संबंधित प्रवाशाला बोलावून आवश्यक ती कागदपत्रे तपासून, ते सामान परत केले जाते. याशिवाय, एखादी महागडी वस्तू सापडल्यास, रेल्वे केवळ 24 तासच ती वस्तू स्थानकावर ठेवते. यानंतर ती वस्तू झोनल ऑफिसला पाठवली जाते.