Join us

जर तुमची कंपनी PF चे पैसे जमा करत नसेल तर? जाणून घ्या तुमचे काय आहेत अधिकार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 1:11 PM

जर तुम्ही काम करत असलेली कंपनी तुमचे पीएफ पैसे जमा करत नसेल तर तुमचे अधिकार काय आहेत? जाणून घ्या.

देशातील सर्वात व्हॅल्युएबल स्टार्टअप कंपन्यांपैकी एक बायजूस (Byju's) सध्या अडचणीचा सामना करत आहे. कंपनीच्या ऑडिटरनंही राजीनामा दिलाय. यासोबतच कंपनीच्या संचालक मंडळातील तीन बिगर प्रवर्तक सदस्यांनीही राजीनामा दिलाय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कॉर्पोरेट मंत्रालय कंपनीची चौकशी करत आहे. कंपनीचे जवळपास निम्मे कर्मचारी इतरत्र नोकरीच्या शोधात असल्याचीही माहिती समोर आलीये.

दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून कंपनीनं कर्मचाऱ्यांचे पीएफचे पैसे जमा केले नसल्याचा आरोप कंपनीतील कर्मचाऱ्यांनी केला होता. कंपनी दर महिन्याला कर्मचाऱ्यांच्या पगारातून पीएफचा भाग कापत आहे, मात्र जमा करत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, पीएफची संपूर्ण थकबाकी भरल्याचा दावा कंपनीनं केलाय. जर तुम्ही काम करत असलेली कंपनी तुमचे पीएफ पैसे जमा करत नसेल तर तुमचे अधिकार काय आहेत? याबद्दल आपण जाणून घेऊ.

वेतनातून पीएफच्या रकमेची कपातखासगी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफचे पैसे त्यांच्या पगारातून कापले जातात. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) अंतर्गत कर्मचाऱ्यांची पीएफ खाती उघडली जातात. या खात्यात मालक आणि कर्मचारी दोघांनाही योगदान द्यावं लागतं. जर एखाद्या कंपनीनं या खात्यात योगदान दिले नाही किंवा विलंब झाल्यास त्याला दंड भरावा लागू शकतो. EPFO च्या नियमांनुसार, प्रत्येक महिन्याला मूळ वेतन आणि डीएच्या 12-12 टक्के रक्कम कंपनी आणि कर्मचारी यांच्यावतीने पीएफ खात्यात जमा केली जाते. कंपनीच्या 12 टक्के योगदानापैकी 8.33 टक्के रक्कम कर्मचारी पेन्शन योजनेमध्ये (EPS) जमा केले जाते आणि उर्वरित 3.67 टक्के रक्कम पीएफ खात्यात जाते.

फौजदारी खटलातज्ञांच्या मते, जर एखाद्या कंपनीनं पीएफ पेमेंटमध्ये डिफॉल्टचा कालावधी दोन महिन्यांपेक्षा कमी असेल, तर वार्षिक पाच टक्के दरानं थकबाकी भरावी लागेल. त्याचप्रमाणे, थकबाकीचा कालावधी दोन महिन्यांपेक्षा जास्त आणि चार महिन्यांपेक्षा कमी असल्यास, 10 टक्के दंड आकारला जाईल. चार ते सहा महिन्यांच्या विलंबासाठी, कंपनीला वार्षिक 15 टक्के दराने दंड भरावा लागेल. सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी 25 टक्के दंड आहे. जर एखाद्या कंपनीनं कर्मचार्‍यांचे पीएफचे पैसे जमा केले नाहीत तर ते गुन्हेगारी कृत्य मानले जाते. अशा परिस्थितीत कामगार मंत्रालय कंपनीविरुद्ध फौजदारी खटला सुरू करू शकतं.

कुठे तक्रार कराल?ईपीएफओ दर महिन्याला आपल्या ग्राहकांना पीएफ खात्यात जमा केलेल्या रकमेची माहिती एसएमएस अलर्टद्वारे देत असते. जर एखाद्या कर्मचाऱ्याला हवं असेल तर तो ईपीएफओ ​​पोर्टलवर लॉग इन करून दरमहा त्याच्या पीएफ खात्यातील शिल्लक देखील जाणून घेऊ शकतो. यावरून खात्यात पैसे जमा होत आहेत की नाही हे कळेल. जर कंपनीने कर्मचाऱ्याच्या पगारातून पैसे कापले आणि ते त्याच्या पीएफ खात्यात जमा केले नाहीत, तर कर्मचाऱ्याला आधी ईपीएफओकडे तक्रार करावी लागेल. यानंतर ईपीएफओ ​​त्या कंपनीची चौकशी करेल. कंपनीनं पैसे कापले पण ते पीएफ खात्यात जमा केले नाहीत, असे चौकशीत स्पष्ट झाले, तर ईपीएफओ कंपनीविरुद्ध कायदेशीर कारवाई करेल.

टॅग्स :भविष्य निर्वाह निधीपैसा