चंद्रकांत दडस, उपसंपादक -
आरोग्य विमा पॉलिसी कोणत्याही वयात घेता येते. फरक एवढाच की, प्लॅनच्या फीचर्समध्ये बदल असतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच तरुणांसाठी वेगवेगळे प्लॅन असतात. वयाच्या ५० व्या वर्षानंतर विमा पॉलिसी घ्यायची असेल, तर सामान्य पॉलिसी घेता येते. यात क्लेम घेतला नसला तरी वयानुसार प्रीमियम वाढत नाही आणि यामध्ये तुमची निश्चित रक्कम दरवर्षी दुप्पट होते. यामध्ये सर्व गंभीर आजारांचाही समावेश असतो.
किती रुपयांची पॉलिसी घ्यावी?
एकदा पॉलिसी घेतल्यावर, कंपनीला पॉलिसीची मर्यादा वाढवण्याचा अधिकार आहे. सुरुवातीला ग्राहकाला असे वाटते की त्याला कमी आरोग्य विम्याची गरज आहे, म्हणून तो कमी घेतो पण एकदा गंभीर आजार झाला की तो विम्याची रक्कम वाढवण्याचा प्रयत्न करतो. तोपर्यंत कंपनीला याचीही जाणीव राहते की नजीकच्या भविष्यात रुग्णाला जास्त खर्च करावा लागणार आहे त्यामुळे ती रक्कम वाढवत नाही. त्यामुळे आपण पॉलिसी घेताना किमान ८ ते १० लाख रुपयांपेक्षा अधिकची घ्यावी?
आईसोबत दुसरी आरोग्य पॉलिसी घेऊ शकतो?
तुम्ही दुसरी आरोग्य पॉलिसी घेऊ शकता. नवीन पॉलिसी घेताना कंपनीने जुन्या पॉलिसीबद्दल विचारले तर त्याची योग्य माहिती द्या. जर ती विचारत नसेल तर इतर पर्यायामध्ये योग्य माहिती द्या. जेव्हाही क्लेम येतो तेव्हा तुम्ही दोन्ही कंपन्यांकडून समान हक्क घेऊ शकता किंवा कोणत्याही एका कंपनीकडून पूर्ण दावा करू शकता. हे ग्राहकांच्या पसंतीवर अवलंबून असते.
माझी मुलगी १८ वर्षांची आहे. तिला पॉलिसीचा फायदा मिळेल?
मुलीला ज्या आजारासाठी रुग्णालयात ॲडमिट केले आहे तो आजार तुमच्या पॉलिसीमध्ये समाविष्ट आहे की नाही हे पाहा. रुग्णाच्या उपचारानंतर, डिस्चार्ज समरी तयार केली जाते. आजार त्यात कव्हर असतील तरच मदत मिळेल.