Lokmat Money > बिझनेस न्यूज > "यात काय नवे? ही तर चक्क उचलेगिरी"; ‘हिंडेनबर्ग’ आरोपांवर अदानी समूहाने दिले प्रत्युत्तर

"यात काय नवे? ही तर चक्क उचलेगिरी"; ‘हिंडेनबर्ग’ आरोपांवर अदानी समूहाने दिले प्रत्युत्तर

माधवी आणि धवल बूच दाम्पत्य म्हणाले की, ती तर आमची वैयक्तिक गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 10:50 AM2024-08-12T10:50:10+5:302024-08-12T10:50:39+5:30

माधवी आणि धवल बूच दाम्पत्य म्हणाले की, ती तर आमची वैयक्तिक गुंतवणूक

What is new in this This is just a copy paste allegations says Gautam Adani Group to 'Hindenburg' allegations | "यात काय नवे? ही तर चक्क उचलेगिरी"; ‘हिंडेनबर्ग’ आरोपांवर अदानी समूहाने दिले प्रत्युत्तर

"यात काय नवे? ही तर चक्क उचलेगिरी"; ‘हिंडेनबर्ग’ आरोपांवर अदानी समूहाने दिले प्रत्युत्तर

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: शाॅर्टसेलर कंपनी ‘हिंडेनबर्ग’ने अदानी समूहाशी संबंधित ऑफशाेअर फंड ‘ग्लाेबल डायनॅमिक अपाॅर्च्युनिटी फंड’मध्ये शेअर बाजार नियंत्रक ‘सेबी’च्या अध्यक्ष माधवी पुरी बूच आणि त्यांचे पती धवल यांची भागीदारी असल्याचा दावा केल्यानंतर पुन्हा चर्चेला सुरुवात झाली. मात्र, हे आराेप निराधार असून, चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न असल्याचे माधवी बूच यांनी म्हटले आहे, तर सार्वजनिक असलेल्या माहितीतील काही निवडक भाग उचलून नव्याने दावे करण्यात आल्याचा हा प्रकार असल्याची प्रतिक्रिया अदानी समूहाने दिली आहे. 

अदानी समूहाने निवेदनात म्हटले आहे की, पूर्वग्रहदूषित निष्कर्षांपर्यंत पाेहाेचण्यासाठी जगजाहीर असलेल्या माहितीतील निवडक भाग उचलून अहवाल बनविण्यात आला आहे. वैयक्तिक लाभासाठी हे काम केले असून, सत्य आणि कायद्याची अवहेलना करण्यात आलेली आहे. 

गुंतवणूक पारदर्शी : अदानी समूह

- परदेशातील बाजारांमध्ये गुंतवणूक करणारे फंड ऑफशाेअर किंवा विदेशी फंड म्हटले जाते. बूच यांनी इंडिया इन्फाेलाइनद्वारे संचलित फंडमध्ये गुंतवणूक हाेती. 
- समूहाच्या शेअर्सचे भाव वाढविण्यासाठी  याच फंडचा वापर विनाेद अदानी यांनी केल्याचा आराेप हिंडेनबर्गने केला आहे. त्यावर अदानी समूहाने म्हटले की, आमची परदेशातील गुंतवणूक पारदर्शी आहे.
- समूहावरील आराेप यापूर्वीच निराधार असल्याचे सिद्ध झाले आहेत.  अदानी पाॅवरमधील ३ आय इन्व्हेस्टमेंट फंडात अनिल आहुजा हे २००७-०८ या काळात नामांकित संचालक हाेते. त्यानंतर २०१७पर्यंत ते अदानी इंटरप्राइजचे संचालक हाेते. समूहाविराेधात करण्यात आलेले आराेप आम्ही पूर्णपणे फेटाळताे. 

सेबीचे साेशल मीडिया खाते लाॅक

हिंडेनबर्गने शनिवारी रात्री उशिरा ब्लाॅगवर नवे दावे करून सेबीच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर सेबीने ‘एक्स’वरील खाते लाॅक केले. मान्यता दिलेल्यांनाच सेबीने केलेल्या पाेस्ट आता पाहता येणार आहेत. 

देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न : ‘ॲम्फी’

म्युच्युअल फंड कंपन्यांची संस्था ‘ॲम्फी’नेदेखील हिंडेनबर्गचे दावे फेटाळले आहेत. या आराेपांमध्ये तथ्य नसून भारतीय नियमन वातावरणाची जाण नसल्याचे दिसते. असे आराेप म्हणजे देशाने कठाे परिश्रम करुन साध्य केलेल्या यशाला मलिन करण्याचे प्रयत्न आहेत. 

आम्ही सर्व आर्थिक व्यवहार जाहीर करू : बूच

- हिंडेनबर्गने केलेले आराेप फेटाळाना बूच दाम्पत्याने एका संयुक्त निवेदनात सांगितले की, आमचे जीवन आणि आर्थिक व्यवहार खुल्या पुस्तकाप्रमाणे असून, सर्व आर्थिक व्यवहार आम्ही जाहीर करू शकताे. 
- हिंडेनबर्गला सेबीने कारणे दाखवा नाेटीस जारी केली हाेती. त्यांनी त्याच्या प्रत्युत्तरात चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला आहे, असे बूच यांनी म्हटले आहे. 
- हिंडेनबर्गने सेबीच्या तपासावर उपस्थित केलेल्या प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली नाही. मात्र, सविस्तर माहितीसह उत्तर देऊ, असे दाम्पत्याने म्हटले आहे. 
- २०१७मध्ये माधवी यांची सेबीवर पूर्णकाळ सदस्य म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या दाेन सल्लागार कंपन्या निष्क्रिय झाल्या.
- माधवी या सेबीमध्ये रुजू हाेण्याच्या २ वर्षांपूर्वी ‘आयआयएफएल’च्या फंडमध्ये वैयक्तिक नागरिक म्हणून गुंतवणूक 
केली हाेती. 

आमची अदानी समूहात गुंतवणूक नाही : ‘३६० वन’

- ३६० वन या कंपनीने हिंडेनबर्गने केलेले दावे फेटाळले आहेत. कंपनीने निवेदन जारी करुन म्हटले आहे की, हिंडेनबर्गच्या अहवालात उल्लेख असलेल्या ‘आयपीई-प्लस फंड१’ने अदानी समूहाच्या शेअर्समध्ये काेणतीही गुंतवणूक केलेली नाही. हा फंड नियमांना धरून हाेता. 
- ऑक्टाेबर २०१३ ते ऑक्टाेबर २०१९ याच कालावधीत फंडची गुंतवणूक हाेती. या फंडातीलसुमारे ४.८ काेटी डाॅलर एवढी म्हणजे जवळपास ९० टक्के  रक्कम बाॅंड्समध्ये गुंतविण्यात आली हाेती. माधवी पुरी बुच आणि धवल बुच यांचा या फंडमधील वाटा १.५ टक्क्यांपेक्षाही कमी हाेता, असे कंपनीने म्हटले आहे.

Web Title: What is new in this This is just a copy paste allegations says Gautam Adani Group to 'Hindenburg' allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.