PM Internship Scheme : नुकतीच सरकारनं 'पंतप्रधान इंटर्नशिप योजना' जाहीर केली आणि त्यासंबंधीचे पोर्टलही सुरू करण्यात आलं. इंटर्नशिप योजनेच पोर्टल सुरू झाल्यानंतर २४ तासांत नोंदणी केलेल्या उमेदवारांची संख्या १ लाख ५५ हजार १०९ झाली आहे. "देशातील प्रमुख ५०० कंपन्या इंटर्नशीपची संधी देत आहे. आतापर्यंत जुबिलंट फूडवर्क्स, मारुती सुझुकी इंडिया, आयशर मोटर्स लिमिटेड, लार्सन अँड टुब्रो, मुथुट फायनान्स आणि रिलायन्स इंडस्ट्रिजसारख्या १९३ कंपन्यांनी इंटर्नशीप ऑफर केली आहे. यामध्ये खासगी क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांचा समावेश आहे," अशी माहिती सरकारशी निगडीत सूत्रांनी इंडिया टुडेला दिली.
बेरोजगारी आणि तरुणांना संधींचा अभाव या मुद्द्यांवरुन विरोधक सातत्यानं सरकारवर निशाणा साधत आहेत. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात रोजगाराच्या संधी वाढविण्याच्या सरकारच्या पुढाकाराचा एक भाग म्हणून या योजनेची घोषणा केली. या उपक्रमाद्वारे सरकारनं टॅलेंट शोधणाऱ्या कंपन्या आणि संधी शोधणारे तरुण यांच्यात एक सेतू तयार केलाय.
तरुणांना कुठे मिळणार संधी?
इंटर्नशिपच्या सर्वाधिक संधी इंधन, गॅस आणि एनर्जी यासारख्या २४ क्षेत्रांमध्ये आहेत. त्याखालोखाल ट्रॅव्हल अँड हॉस्पिटॅलिटी, ऑटोमोटिव्ह, बँकिंग आणि फायनान्शिअल सर्व्हिसेसचा क्रमांक लागतो. ऑपरेशन मॅनेजमेंट, प्रॉडक्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग, मेंटेनन्स, सेल्स अँड मार्केटिंग अशा २० हून अधिक क्षेत्रात तरुणांसमोर इंटर्नशिपची संधी आहे. ज्यांना इंटर्नशीप करायची आहे त्यांना देशभरात संधी देण्यात येतील.
कोण करू शकतं अर्ज?
बारावीनंतर ऑनलाइन किंवा डिस्टन्स एज्युकेशन घेणारे विद्यार्थी इंटर्नशिप प्रोग्रामसाठी अर्ज करू शकतात. अर्जदाराचं वय २१ ते २४ वर्षादरम्यान असावं. २४ वर्षांवरील उमेदवारांना या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही. ज्या तरुणांचं कौटुंबिक उत्पन्न वार्षिक ८ लाखांपेक्षा जास्त आहे किंवा कुटुंबातील कोणताही सदस्य कायमस्वरूपी सरकारी नोकरी करतो किंवा आयआयटी, आयआयएम, आयसर, एनआयडी, आयआयआयटी, एनएलयू सारख्या मोठ्या संस्थांमधून पदवीधर झाला असेल तर तेदेखील या योजनेअंतर्गत अर्ज करू शकणार नाहीत.