Join us  

काय आहे 'प्रधानमंत्री सूर्योदय योजना', मोदींनी अयोध्येवरून येताच केली घोषणा; कोणाला लाभ?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 1:43 PM

अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून परतताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठा निर्णय घेतलाय.

Pradhan Mantri Suryodaya Yojana: अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून परतताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठा निर्णय घेतलाय. सोमवारी त्यांनी एक मोठी घोषणा केली ज्यामुळे सर्वसामान्यांना वीज बिलात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. पंतप्रधान मोदींनी एका नवीन योजनेची घोषणा केली असून तिचं नाव प्रधानमंत्री सूर्योदय योजना असं आहे. यासाठी सरकारने एक कोटीहून अधिक घरांच्या छतावर सोलर बसवण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. गरीब आणि मध्यमवर्गीयांचा विजेवर खर्च होणारा पैसा वाचवणं हा या योजनेचा उद्देश आहे. पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करून या योजनेची माहिती दिली.काय म्हणाले पंतप्रधान?'जगातील सर्व भक्तांना सूर्यवंशी भगवान श्री रामाच्या प्रकाशातून नेहमीच ऊर्जा मिळते. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्तावर, भारतातील लोकांच्या घराच्या छतावर स्वतःची सोलर रूफ टॉप यंत्रणा असावी हा माझा संकल्प आणखी दृढ झाला आहे,' असं पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिलंय. अयोध्येहून परतल्यानंतर, मी पहिला निर्णय घेतला आहे की आमचं सरकार १ कोटी घरांवर रूफटॉप सोलर बसवण्याचं लक्ष्य घेऊन 'प्रधानमंत्री सूर्योदय योजना' सुरू करणार आहे. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल तर कमी होईलच, पण ऊर्जा क्षेत्रात भारत स्वावलंबी होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.कोणाला होणार लाभ?प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा सर्वाधिक लाभ गरीब आणि मध्यमवर्गीयांना मिळण्याची अपेक्षा आहे. सध्या या वर्गाला आपल्या कमाईचा मोठा हिस्सा वीज बिलाच्या स्वरूपात खर्च करावा लागतो. अद्याप देशात अशी काही ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी घराघरांत वीज पोहोचलेली नाही. या योजनेंतर्गंत कोट्यवधी घरं उजळणार आहेत.

 

टॅग्स :नरेंद्र मोदीअयोध्याराम मंदिर