Lokmat Money > बिझनेस न्यूज > कर्ज मिळण्यासाठी सिबिल स्कोअर किती असावा? जाणून घ्या डिटेल्स

कर्ज मिळण्यासाठी सिबिल स्कोअर किती असावा? जाणून घ्या डिटेल्स

सर्वप्रथम व्यावसायिकाने एक सक्षम व्यवसाय योजना बनवून व्यवसायातील कामगिरीचा सशक्त ट्रॅक रेकॉर्ड बँकेला प्रदर्शित करावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 02:48 PM2023-04-24T14:48:12+5:302023-04-24T14:48:36+5:30

सर्वप्रथम व्यावसायिकाने एक सक्षम व्यवसाय योजना बनवून व्यवसायातील कामगिरीचा सशक्त ट्रॅक रेकॉर्ड बँकेला प्रदर्शित करावा

What is the CIBIL score to get a loan? Know the details | कर्ज मिळण्यासाठी सिबिल स्कोअर किती असावा? जाणून घ्या डिटेल्स

कर्ज मिळण्यासाठी सिबिल स्कोअर किती असावा? जाणून घ्या डिटेल्स

प्रतिक कानिटकर

प्रश्न : मी नवउद्योजक असून, मला बँकेकडून व्यावसायिक कर्ज घ्यायचे आहे. बँका नेमके कोणते घटक लक्षात घेतात?
उत्तर : एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात करताना उद्योजकाला भांडवल उभारणी या मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागते. बँका आणि आर्थिक संस्था, व्यवसाय जीवनचक्राच्या विविध टप्प्यांवर आर्थिक मदत देतात; परंतु अशी कर्ज देताना ते काही मुद्दे लक्षात घेतात.  

सर्वप्रथम व्यावसायिकाने एक सक्षम व्यवसाय योजना बनवून व्यवसायातील कामगिरीचा सशक्त ट्रॅक रेकॉर्ड बँकेला प्रदर्शित करावा. प्रमुख उत्पादने आणि सेवांचा सारांश, व्यावसायिकाचा व्यावसायिक क्षेत्रातील अनुभव, उत्पादनासाठी लक्ष्य बाजारपेठ, उत्पादनाची माहिती आणि उत्पादनाची निवड करण्याची कारणे, मार्केटिंगच्या योजना, कर्जाचा हेतू, आर्थिक स्टेटमेंट, अंदाजित महसूल मॉडेल, करानंतरचा नफा आदी मुद्दे मांडून उत्तम प्रोजेक्ट रिपोर्टची आखणी केली पाहिजे.
भांडवल उभारणीमध्ये योगदान

बँका कर्ज देताना व्यावसायिक भांडवल उभारणीच्या प्रक्रियेमध्ये व्यावसायिकाने आजवर केलेले भांडवल योगदान जरूर लक्षात घेतात, त्यालाच ओन काॅन्ट्रिब्युशन असे म्हणतात. जर मालक स्वतःच्या व्यवसायात स्वतःच गुंतवणूक करीत नसेल तर बँकांनी तरी गुंतवणूक का करावी, हा प्रश्न व्यावसायिकाला कर्जासाठी अर्ज करताना विचारला जाऊ शकतो. जेव्हा व्यावसायिकाचे अधिक वैयक्तिक भांडवल लागलेले असते, तेव्हा तो व्यवसाय जतन करण्यासाठी आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी अधिक काटेकोर असतो हे धोरण पाहण्यात येते.

उत्तम सिबिल स्कोअर

बँका तसेच वित्तीय संस्था सिबिल स्कोअर पाहून मगच कर्जदाराची कर्ज घेण्याची पात्रता ठरवितात. सिबिलमधील उत्तम स्कोअर हा चांगला क्रेडिट इतिहास आणि जबाबदार कर्जाच्या परतफेडीचे वर्तन सूचित करतो. सिबिल स्कोअर जितका जास्त असेल तितकी कर्जमंजुरीची शक्यताही अधिक असते. सिबिल स्कोअर हा ३०० ते ९०० गुणांदरम्यान असतो आणि ७५० पेक्षा अधिक गुण हे सामान्यतः चांगला स्कोअर म्हणून ओळखला जातो. सिबिल स्कोअर जर ७५० हून अधिक असल्यास, अशा कर्जदारांना सर्वोत्कृष्ट व्याजदरांसह कर्ज आणि क्रेडिट कार्ड उपलब्ध केले जाते. 

कर्ज परतफेड करण्याची क्षमता

कर्ज परतफेड करण्याची क्षमता तपासली जाते. अर्ज करताना सर्वप्रथम बँकांना, तो कंपनीच्या रोख मिळकतीमधूनच म्हणजेच व्यावसायिक उत्पनामधूनच कर्जाची परतफेड कशाप्रकारे सक्षमपणे करू शकतो, हे प्रस्थापित केले पाहिजे.
कर्ज देताना बँक हे जरूर लक्षात घेते की भविष्यात जर व्यावसायिकाला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले तर कर्जाच्या परतफेडीला कोणते पर्याय उपलब्ध आहेत आणि हे प्रस्थापित करण्याकरिता योग्य आर्थिक अंदाजानुसार चांगले व्यावसायिक बजेट ज्यामध्ये आकस्मिक निधी यांचा समावेश केलेला असेल तर बँकेला कर्ज देताना कर्जदाराबद्दल अधिक विश्वास वाटू शकतो.


(लेखक चार्टर्ड सेक्रेटरी आहेत)
 

Web Title: What is the CIBIL score to get a loan? Know the details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.