जेव्हा तुम्ही कोणतंही इलेक्ट्रॉनिक उत्पादन किंवा अन्य वस्तू खरेदी करता तेव्हा तुम्हाला निश्चितपणे वॉरंटी किंवा गॅरेटी दिली जाते. सहसा प्रत्येक उत्पादनावर एक किंवा दोन वर्षांची वॉरंटी दिली जाते. यामुळे कोणत्याही उत्पादनावरचा विश्वास वाढतो. पण वॉरंटी आणि गॅरंटी यातील फरक तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही देखील कोणतेही उत्पादन खरेदी करणार असाल तर तुम्हाला तुमच्या उत्पादनावर मिळणारी वॉरंटी आहे का गॅरंटी आहे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
गॅरंटी किंवा वॉरंटी असलेली उत्पादने थोडी महाग मिळतात, परंतु त्यांची विश्वासार्हता चांगली असते. असे बरेच लोक आहेत ज्यांना याच्यातील फरक माहित नाही आणि ते दोन्ही एकच सारखं असल्याचं मानतात. असेही काही लोक आहेत ज्यांना त्यांच्यातील फरक माहित आहे, परंतु त्यांच्या तरतुदी काय आहेत याबद्दल ते संभ्रमात राहतात.
वॉरंटी म्हणजे काय?
विक्रेत्यानं ग्राहकाला दिलेली विशेष सवलत ज्यामध्ये विकलं गेलेलं उत्पादन खराब झाल्यास दुकानदार किंवा कंपनीकडून त्याची दुरुस्ती केली जाते. याला वॉरंटी म्हणतात. वॉरंटी कालावधी दरम्यान उत्पादनामध्ये काही समस्या असल्यास, ते विनामूल्य दुरुस्त केले जाऊ शकते. मात्र, यासाठी खरेदी केलेल्या वस्तूचे कन्फर्म बिल किंवा वॉरंटी कार्ड असणं आवश्यक आहे.
गॅरंटी म्हणजे काय?
जर ग्राहकाला विक्रेत्यानं किंवा कंपनीनं खरेदी केलेल्या मालावर गॅरंटी दिली असेल, तर याचा अर्थ असा होतो की या कालावधीत ती वस्तू खराब झाली, तर ग्राहकाला त्याच्या मोबदल्यात नवी वस्तू मिळते. ठराविक कालावधीकरिताच गॅरंटी दिली जाते. याशिवाय, ग्राहकाकडे त्या वस्तूचे कन्फर्म बिल किंवा गॅरंटी कार्ड असणं आवश्यक आहे. परंतु आता बहुतांश कंपन्यांनी गॅरंटी ऐवजी वॉरंटी देण्यास सुरुवात केली आहे.