अर्जुन : कृष्णा, करदात्यांनी दाखल केलेल्या जीएसटी रिटर्नच्या पडताळणीसाठी जीएसटी विभागाने जारी केलेली नवीन सूचना काय आहे?
कृष्ण : जीएसटी विभागाने २६ मे २०२३ रोजी आर्थिक वर्ष २०१९-२० व पुढील आर्थिक वर्षात दाखल केलेल्या जीएसटी रिटर्नच्या पडताळणीसाठी निर्देशनाद्वारे एसओपी (मानक कार्यप्रणाली) जारी केला आहे. या पडताळणीसाठी करदात्यांची निवड जीएसटीमध्ये निर्देशित केलेले निकष आणि रिटर्नमधील त्रुटी यांच्या आधारे केली जाईल.
अर्जुन : ही प्रक्रिया काय असेल?
कृष्ण : रिटर्नच्या पडताळणीसाठी अधिकारी खालील प्रक्रियांचे पालन करेल.
१. करदात्याने एका आर्थिक वर्षामध्ये दाखल केलेल्या रिटर्नची पडताळणी करण्यासाठी अधिकारी स्क्रुटिनी डॅशबोर्डवरची माहिती व ईवे बिल पोर्टलसारख्या इतर स्त्रोतांवर उपलब्ध असलेल्या माहितीचा वापर करेल.
२. करदात्याला फॉर्म ASMT-१० मध्ये नोटीस जारी केली जाईल. त्यातील रक्कम आणि अन्य मुद्द्यांवर अधिकारी करदात्यांकडून स्पष्टीकरण मागवेल.
३. करदाते नोटिशीत नमूद केलेला कर भरून त्याची माहिती ASMT-११ द्वारे दाखल करायची आहे. जर करदात्यांना नोटिशीमध्ये उपस्थित केलेले मुद्दे आणि इतर तपशील मान्य नसेल, त्यांना ASMT-११ द्वारे खुलासा करावा लागेल, त्याच्या समर्थनार्थ पुरावे द्यावे लागतील.
४. करदात्याने केलेला खुलासा/दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक असेल किंवा करदात्याने कर भरला असेल तर अधिकारी करदात्याला ASMT-१२ द्वारे त्याची माहिती देऊन कार्यवाही पूर्ण करेल.
५. स्पष्टीकरण समाधानकारक नसेल किंवा नोटीस जारी केल्यापासून ३० दिवसांच्या आत करदात्याने स्पष्टीकरण दाखल केले नसेल तर अधिकारी ३० दिवसांची मुदत संपल्यानंतरच्या १५ दिवसांत जीएसटीच्या कायद्यात नमूद केलेली कार्यवाही सुरू करतील.
अर्जुन : यातून काय बोध घ्यावा?
कृष्ण : करदात्याने जीएसटी पोर्टलवर जारी केलेल्या नोटिसांची वेळोवेळी पडताळणी केली पाहिजे आणि त्यासंबंधित सूचनांचे पालन वेळेवर केले पाहिजे. कोणत्याही स्पष्टीकरणाच्या समर्थनासाठी वहिखाते आणि रेकॉर्डची देखभाल करणे तितकेच महत्त्वाचे आहे.