प्रितीष किशोर गोविंदपुरकर
ट्रॅव्हल इन्शुरन्स हा विमा क्षेत्रातील अतिशय छोटा पण खूप महत्त्वाचा प्रकार. बरेच वेळेस ट्रॅव्हल इन्शुरन्सबद्दल माहितीच नसते. जे लोक नेहमी प्रवास करतात अशा लोकांनाच याची माहिती असते. करोनाच्या महासाथीनंतर याचं महत्व अजून वाढलंय. बहुतांश देशांनी त्यांच्या व्हिसा प्रक्रियेसाठी ट्रॅव्हल इन्शुरन्स अनिवार्य केले आहे. ट्रॅव्हल इन्शुरन्स म्हणजे एखादी व्यक्ती प्रवासा साठी बाहेर जात असेल तर त्या व्यक्तीला वेगवेगळे आवरण देणे.
अमेरिकन डॉलर हे चलन जागतिक बाजारामध्ये मान्यताप्राप्त असल्यामुळे बहुतांश कंपन्यांचे कव्हरेजही अमेरिकन डॉलरमध्ये असतात. पण त्याचा हप्ता (Premium) मात्र भारतीय चलनात म्हणजेच रुपयांत (INR) असतो. ट्रॅव्हल इन्शुरन्सचा हप्ता हा प्रवास करणारी व्यक्तीचे वय, प्रवासाचे दिवस आणि हवे असलेले सम इन्शुअर्ड म्हणजेच विमा आवरणावर अवलंबून असते. बहुतांश कंपन्यांचं सम इन्शुरन्स हे कमीत कमी ५०,००० अमेरिकन डॉलर पासून चालू होतं आणि ते १०,००,००० अमेरिकन डॉलर्सपर्यंत जातं.
ट्रॅव्हल इन्शुरन्सचे ४ प्रकार
१. इंरनॅशनल ट्रॅव्हल इन्शुरन्स
२. स्टुडेन्ट ट्रॅव्हल इन्शुरन्स
३. कॉर्पोरेट ट्रॅव्हल इन्शुरन्स
४. डोमेस्टिक ट्रॅव्हल इन्शुरन्स
१. इंरनॅशनल ट्रॅव्हल इन्शुरन्स
जी व्यक्ती भारताच्या बाहेर प्रवासासाठी जाते त्यांना इंरनॅशनल ट्रॅव्हल इन्शुरन्स देता येतो. यामध्ये टुरिस्ट, व्यक्तीगत किंवा फॅमिली व्हिजिट अशा कोणत्याही व्हिसावर जाणाऱ्या व्यक्ती हा इन्शुरन्स घेऊ शकतात. हा इन्शुरन्स ती व्यक्ती विमानामध्ये बसल्यापासून ते पुन्हा मायदेशी परतण्यापर्यंत लागू असतो. हा विमा मर्यादित कालावधीसाठी असतो आणि प्रत्येक प्रवासाच्या वेळेस तो नवीन काढावा लागतो.
२. स्टुडेन्ट ट्रॅव्हल इन्शुरन्स
जे विद्यार्थी बाहेरील देशांमध्ये शिक्षणासाठी जातात त्यांना विद्यार्थी प्रवासी विमा किंवा स्टुडेंट ओव्हरसिज हेल्थ इन्शुरन्स घेता येतो. यामध्ये कोर्सचा पूर्ण कालावधीचा समावेश करता येतो. याशिवाय आरोग्यासोबतच अन्य अनेक सुविधांचा लाभ मिळतो. पालकांना या इन्शुरन्सची जबाबदारी उचलावी लागते.
३. कॉर्पोरेट ट्रॅव्हल इन्शुरन्स
विविध कामांसाठी कंपनी जेव्हा त्यांच्या कर्मचाऱ्यांना परदेशी पाठवतात तेव्हा त्यांना कॉर्पोरेट ट्रॅव्हल इन्शुरन्स दिला जातो. यामध्ये कंपनीच्या फायद्याला अनुसरून काही कव्हर घेतले जातात. यामध्ये कर्मचाऱ्यांना सतत प्रवास करावा लागतो त्यामुळे हा मल्टी ट्रीप असतो. प्रत्येक वर्षी हा विमा रिन्यू करावा लागतो. हा मूळ कंपनीच्या नवे घेतला जातो आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांना देता येतो.
४. डोमेस्टिक ट्रॅव्हल इन्शुरन्स
देशात कोणत्याही ठिकाणी प्रवास करताना मुख्यत्वे हा इन्शुरन्स घेतात. बहुतांश करून कठीण ठिकाणी प्रवास करताना सध्या ह्या इन्शुरन्स घेतला जातो. बरेच वेळेस तिकीट काढताना हा इन्शुरन्स बंडल केलेला दिसतो. यामध्ये हेअल्थ इन्शुरन्सवर अधिक भर दिलेला असतो. परंतु सध्या याचा वापर खूप कमी प्रमाणात केला जात आहे.
खरं तर ट्रॅव्हल इन्शुरन्स खुप बहुआयामी आहे. कारण यामध्ये ३ प्रकारचे विविध पद्धतीचे कव्हर मिळतात.
१. हेल्थ -
अपघाती किंवा कोणत्याही आजारमुळे रुग्णलायात जाणं.
तसंच अपघाती मृत्यू झाल्यास वारसाला ठराविक रकम देणं.
२. प्रवास -
विमानाला उशीर होणं किंवा विमान रद्ध होणं.
बॅग हरविणं किंवा बॅग वेळे वर न येणं.
प्रवास रद्द होणं.
३. गैरसोय -
पासपोर्ट हरवणं आणि त्यामुळे नवीन घ्यावा लागणं.
इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स हरवणं, त्यामुळे नवीन घ्यावा लागणं.
कोणत्याही कायदेशीर गोष्टीमध्ये अडकल्यास त्याची भरपाई देखील मिळते (THIRD PARTY LIABILITY)
मूळात खूप कमी अशा लोकांना ट्रॅव्हल इन्शुरन्स या विषयाची माहिती आहे किंवा बरेच वेळेस लोकांना माहित असुनही लोक ते घेण्यासाठी टाळाटाळ करतात. पंरतु जेव्हा आपात्कालिन स्थिती उद्भवते तेव्हा त्याना यांची जाणीव होते.
PAYING IN INR IS BETTER THAN PAYING IN DOLLOR ...
(लेखक हे विमा क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.)