Join us

तुमचा अर्ज कोणता ? नीट तपासून घ्या! आयटीआर फॉर्मबाबत अधिसूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 9:03 AM

यंदा ही अधिसूचना आधीच जारी केली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी)  वित्त वर्ष २०२३-२४ साठी आयटीआर-१ (सहज) आणि आयटीआर-४ (सुगम) हे अर्ज जारी केले असून, या दोन्ही अर्जांत काही बदल करण्यात आले आहेत. मागच्या खेपेला सरकारने २०२३ चा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आयटीआर फॉर्मबाबत अधिसूचना जारी केली होती. यंदा ही अधिसूचना आधीच जारी केली आहे. 

आयटीआर-१ (सहज) 

वेतन, एक घर, कौटुंबिक निवृत्ती वेतन, बँक व पोस्टातील व्याज आणि ५ हजार रुपयांपर्यंत शेती उत्पन्न असणाऱ्यांसाठी हा अर्ज आहे. ५० लाखांपर्यंत उत्पन्न असलेले लोक हा अर्ज भरू शकतात. निवासी बिगर-सामान्य निवासी (आरएनओआर) आणि अनिवासी भारतीय (एनआरआय) यांच्यासाठी हा अर्ज नाही. जुगार, लॉटरी, भांडवली लाभ याद्वारे उत्पन्न मिळणाऱ्यांसाठीही हा अर्ज नाही.

काय झाले बदल?

या अर्जात टाइप सी-वजावट आणि करपात्र एकूण उत्पन्न यासाठी नवीन ८०सीसीएच फिल्ड जोडण्यात आले आहे. त्यानुसार अग्निपथ योजनेतील योगदानासाठी १०० टक्के कर सवलत मिळेल. याशिवाय पार्ट-ई मध्ये करदात्यांना आपल्या सक्रिय बँक खात्यांची माहिती द्यावी लागेल.

आयटीआर-४ (सुगम)

हा अर्ज ५० लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेली हिंदू अविभाज्य कुटुंबे आणि संस्था यांच्यासाठी आहे. याशिवाय कंत्राटी आयटी व्यावसायिक, शिकवणी घेणारे शिक्षक, घरून काम करणारे व्यावसायिकही हा अर्ज वापरू शकतात. हा अर्जही आरएनओआर आणि एनआरआय यांच्यासाठी नाही.

नेमके कोणते बदल?

कलम ४४एडी आणि ४४एडीए नुसार करदात्यांना ३ श्रेणीत उलाढाल विभाजित करावी लागेल. रोखीबरोबर धनादेश व अन्य साधनांद्वारे मिळालेल्या उत्पन्नाची माहिती द्यावी लागेल.

 

टॅग्स :इन्कम टॅक्स