अनेकदा आपल्या बँकेची शाखा ज्या ठिकाणी नसते त्या ठिकाणी अचानक आपल्याला रोकड पैशाची गरज निर्माण झाली, तर दुसऱ्या बँकेच्या एटीएम सेंटरवर पैसे मिळण्याची सोय हा उत्तम उपाय आहे. अर्थात ही सोय आपल्याला सशर्त मिळत असते. या सोयीला ‘थर्ड पार्टी एटीएम’ असे म्हटले जाते.
त्याच्या वापराबाबत रिझर्व्ह बँकेने काही नियम केले आहेत. दुसऱ्या बँकांच्या ‘एटीएम’मार्फत केवळ पाचच व्यवहार मोफत करता येतात. यात वित्तीय व्यवहारांव्यतिरिक्तच्या व्यवहारांचा (‘अकाउंट स्टेटमेंट’ किंवा ‘मिनी स्टेटमेंट’ पाहणे, ‘बॅलन्स चेक’) समावेश आहे.
पूर्वी बिगरवित्तीय व्यवहारांवर कोणतीही मर्यादा नव्हती. आता अशा व्यवहारांवर शुल्क लागू शकते. जो आपला ग्राहक नाही अशा व्यक्तीला रोकड देण्यासाठी बँकेला काही वेगळी व्यवस्था करावी लागते. त्यासाठी काही खर्च येतो. त्यासाठी सेवाशुल्क आकारले जाते. ‘थर्ड पार्टी एटीएम’ मोफत वापरण्याची मर्यादा संपल्यास वेगळे शुल्क आकारले जाते. त्याचे दर रिझर्व्ह बँकेच्या धोरणांनुसार ठरवले जातात. मात्र खासगी बँका बऱ्याचदा स्वतःचे वेगळे दर ठरवीत असतात. केंद्र सरकारचे धोरण लोकांचे रोकड रकमेचे व्यवहार कमी व्हावेत असे आहे.
एटीएम कार्डाच्या वापरावर निर्बंध आणले जात आहेत हे खरे असले तरी आपले एटीएम कार्ड हे एक डेबिट कार्डदेखील असते. म्हणजेच एटीएम कार्डाचा पाचपेक्षा जास्त वेळा वापर केला तर आपल्याला सेवाशुल्क लागू शकते. मात्र कार्ड वापरून रोख रक्कम काढण्यापेक्षा हेच कार्ड स्वाइप करून आपले व्यवहार पूर्ण करता येतात. आपले कार्ड किती वेळा स्वाइप करावे यावर (निदान अजून तरी) कोणतीही मर्यादा नाही. एटीएममधून पैसे काढण्याऐवजी कार्ड स्वाइप करून एटीएम कार्डाच्या वापराची गरजच आपल्याला कमी करता येऊ शकते.
अलीकडच्या काळात अनेक व्यावसायिक आस्थापनांकडे कार्डस स्वाइप करण्यासाठी लागणारी उपकरणे उपलब्ध आहेत. त्यामुळे डेबिट कार्ड म्हणून एटीएम कार्डाचा वापर करून आपण या शुल्कापासून आपली सुटका करून घेऊ शकतो. आपल्याभोवतीचे बँकिंग व्यवहार ‘स्मार्ट’ होत असताना आपणदेखील स्मार्ट होणे आवश्यक आहे.
- ग्राहक प्रबोधन आणि संशोधन संस्था, नाशिक
तुमचे प्रश्न / अडचणी पाठवण्यासाठी ई-मेल पत्ता : tarkaikaral@gmail.com