Join us

मातृत्व विमा घेताना कोणती काळजी घ्यावी? कोणते लाभ मिळतात, कसा निवडाल प्लान? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 10:31 AM

सामान्य आरोग्य विम्यामध्ये महिलेचा प्रसूतीचे खर्च गृहीत धरला जातोच असे नाही. अनेक जोडप्यांना याची माहिती नसते. प्रसूतीकाळातील सर्व उपचार आणि आजारांचे कव्हरेज हवे असेल तर मातृत्व विमा घेणे गरजेचे असते

सामान्य आरोग्य विम्यामध्ये महिलेचा प्रसूतीचे खर्च गृहीत धरला जातोच असे नाही. अनेक जोडप्यांना याची माहिती नसते. प्रसूतीकाळातील सर्व उपचार आणि आजारांचे कव्हरेज हवे असेल तर मातृत्व विमा घेणे गरजेचे असते. पालकत्वाच्या वाटेवर असतानाच जोडप्यांनी योग्यवेळी मातृत्व विमा संरक्षण घेतले पाहिजे. यामुळे प्रसूतीच्या काळात येणारा खर्चाचा ताण हलका होता. मातृत्वाचा आनंदही नीटपणे घेता येतो.

विम्यामुळे कोणते लाभ मिळतात? 

  • मातृत्व विमा हा एक प्रकारचा आरोग्य विमाच आहे. यात प्रसूतीच्या काळातील संबंधित सर्व खर्च कव्हर केले जातात. 
  • प्रसूतीपूर्व काळातील तसेच प्रसूतीनंतरच्या काळातील खर्चही काही कंपन्या यात कव्हर करीत असतात.
  • काही कंपन्या आपल्या महिला कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा पॉलिसीच्या अंतर्गत मातृत्व खर्चाचाही लाभ देतात.
  • चालू असलेल्या आरोग्य विमा पॉलिसीमध्ये मातृत्व विमा सुविधा अॅड ऑन करण्याची संधी काही कंपन्या देतात. त्यासाठी वाढीव प्रिमियम भरावा लागू शकतो.
  • या पॉलिसीमध्ये प्रसूतीच्या काळात करावयाये लसीकरण, इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट आदी खर्चही दिला जातो.
  • काही पॉलिसीमध्ये सरोगसी तसेच आयव्हीएफ ट्रीटमेंटचाही खर्च सामील केला जातो. 

योग्य प्लान कसा निवडावा? 

  1. सर्वप्रथम पॉलिसीमध्ये कोणकोणत्या बाबी कव्हर केल्या आहेत हे तपासून घ्यावे. प्लानमध्ये ब्लड टेस्ट, अल्ट्रासाऊंट टेस्ट आदी चाचण्यांचा समावेश केलेला असावा. प्रसूतीपूर्व लसीकरण, नवजात शिशुचे लसीकरण याचा समावेश त्यात असावा.
  2. नवजात शिशुचे आजार आणि उपचार या बाबी पहिल्या दिवसापासून कव्हर होतील हे पाहावे. पुरेसे कव्हरेज आणि योग्य नुकसानभरपाई याचा त्यात समावेश असावा. रुग्णालयात दाखल केल्यानंतर खोली भाडे, कॅशलेस हॉस्पिटलायझेशन, इतर सहरोगांवरील उपचार आदी बाबी यात आहेत याची खात्री करावी.
  3. पॉलिसीचा प्रतीक्षा कालावधी किती आहे हे पाहून घ्यावे. हा कालावधी दोन ते सहा वर्षाच्या दरम्यान असतो. पॉलिसीसोबत दिल्या जात असलेल्या अन्य सवलती, प्रीमियमच्या रकमेत सूट याची माहिती घ्या. इतर कंपन्यांचे प्रिमियम, सवलती तसेच अन्य लाभांशी तुलना करून पाहा.
टॅग्स :व्यवसाय