चंद्रकांत दडस, उपसंपादक
बँकांमध्ये धनादेश अर्थात चेक देताना काही वेळेला समस्या निर्माण होतात. गेल्या काही वर्षांपासून डिजिटल व्यवहार वाढले असले तरीही अनेक ठिकाणी सध्या धनादेशाद्वारे व्यवहार करावे लागतात. अशावेळी धनादेश देताना विशेष काळजी घ्यावी लागते, अन्यथा यात फसवणूक होण्याची भीती असते.
कोरे धनादेश देणे टाळा
अनेक वेळा लोक इतरांवर विश्वास ठेवतात आणि कोऱ्या चेकवर स्वाक्षरी करून देतात. ही चूक तुम्हाला त्रास देऊ शकते. नेहमी आपल्याच हाताने धनादेश भरा. असे केल्याने चेकमध्ये कोणत्याही प्रकारची फसवणूक होण्याची शक्यता खूप कमी होते.
ओव्हररायटिंग करू नका
कटिंग किंवा ओव्हररायटिंगसह चेक रद्द केला जाऊ शकतो. निर्धारित वेळेत पैसे भरण्यात अयशस्वी झाल्यास चेक बाऊन्स होऊ शकतो. त्यामुळे कटिंग किंवा ओव्हररायटिंग झाल्यास दुसरा चेक भरून द्या.
रक्कमदेखील शब्दात लिहा
चेक देताना सुरक्षितता लक्षात घेऊन, रक्कम शब्दातही लिहा. चेकचा फोटोही काढा. अनेकदा लोक तारीख लिहिणे टाळतात. अनेक वेळा तारीख न लिहिल्यानेही फसवणूक होऊ शकते. त्यामुळे जी काही संभाव्य तारीख असेल, ती त्यावर लिहिली पाहिजे.
चेकची माहिती ठेवा
जेव्हा तुम्ही एखाद्याला बँकेचा धनादेश देता तेव्हा त्याचा तपशील तुमच्याकडे ठेवा. चेकबुक नेहमी सुरक्षित ठिकाणी ठेवा. जेव्हाही तुम्हाला बँकेकडून चेकबुक मिळेल तेव्हा त्यातील चेक काळजीपूर्वक मोजा. काही विसंगती लक्षात आल्यास तत्काळ बँकेला कळवा. जेव्हाही तुम्ही चेक रद्द कराल तेव्हा एमआयसीआर बँड फाडून टाका आणि संपूर्ण चेकवर कॅन्सल (“CANCEL”) लिहा. एमआयसीआर बँडवर लिहू नका किंवा सही करू नका.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"