डॉ. पुष्कर कुलकर्णी
आजच्या तरुण पिढीने शेअर बाजार हा एक दीर्घकालीन उत्तम गुंतवणूक पर्याय आहे, यावर विश्वास ठेवून त्याकडे पाहायला हवं. नोकरी लागताच ते पैसे लाईफस्टाईलवर न उडवीता शेअर बाजारामध्ये पद्धतशीरपणे दीर्घकालीन गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
भविष्यासाठी आपण वेगवेगळ्या माध्यमातून गुंतवणूक करीत असतो. या गुंतवणुकीमधून चांगला परतावा मिळावा, अशी प्रत्येक गुंतवणूकदाराची अपेक्षा असते. गुंतवणुकीसाठी विविध पर्यायांमध्ये बँकेमधील फिक्स डिपॉझिट योजना, पोस्टाच्या विविध बचत योजना - जसे रिकरिंग डिपॉझिट, मासिक प्राप्ती योजना, टर्म डिपॉझिट, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकास पत्र, लहान मुलींसाठी सुकन्या योजना असे पारंपरिक पर्याय आहेतच. या व्यतिरिक्त पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, नॅशनल पेन्शन स्कीम, एल आय सी आणि इतर इन्शुरन्स कंपन्यांचे विविध प्लॅन्स गुंतवणुकीसाठी पर्याय म्हणून उपलब्ध आहेत.
शेअर बाजाराशी निगडीत, परंतु गुंतवणूकदारांचा त्यामधील व्यवहाराशी थेट हस्तक्षेप नसलेल्या म्युच्युअल फंड योजनेतसुद्धा रक्कम गुंतवली जाऊ शकते. शासकीय आणि खाजगी संस्था यांचे बॉण्ड्स आणि डिबेंचर्स हा सुद्धा गुंतवणुकीचा एक मार्ग आहे. परंतु याहूनही अधिक परतावा मिळू शकतो अशी शेअर बाजारातील गुंतवणूक हा 'हाय रिस्क, हाय रिवॉर्ड' या तत्वात मोडणारा एक गुंतवणुकीचा मार्ग आहे.
वर उल्लेख केलेल्या विविध गुंतवणूक योजनांचे फायदे आणि तोटे आहेत. कमी व्याजदर किंवा कमी परतावा, परंतु मुद्दल रकमेची हमी, यामुळे अनेक गुंतवणूकदार वरील मार्गांचा अवलंब करतात. परंतु जेव्हा शेअर बाजाराचा गुंतवणुकीसाठी पर्याय म्हणून विचार केला जातो, तेव्हा शेअर बाजाराबद्दलच्या अज्ञानामुळे बरेच गुंतवणूकदार त्याकडे वळत नाहीत. खरे तर, आपली गरज लक्षात घेता, वरील गुंतवणुकीच्या पर्यायांमधून काही पर्याय निवडून काही रक्कम ही दरमहा शेअर बाजारात योग्य पद्धतीने गुंतवली तर त्याचे भविष्यातील रिटर्न्स हे सर्वात जास्त ठरू शकतात आणि म्हणूनच प्रत्येकाने शेअर बाजाराकडे बघताना उच्चतम परतावा देणारा मार्ग म्हणूनच पाहिले पाहिजे.
याचा अर्थ, जितकी रक्कम बचतीसाठी आपण बाजूला काढतो ती सर्वच्या सर्व शेअर बाजारातच गुंतवावी असे मुळीच नाही. काही रक्कम ही आवश्यकतेनुसार इन्शुरन्स आणि काही रक्कम टॅक्स सेव्हिंग गरजेनुसार विविध पर्याय निवडून त्याठिकाणी अवश्य गुंतवावी. याच बरोबर महिन्यातील आपल्या उत्पन्नातील ठरावीक रक्कम अवश्य बाजूला काढून दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून शेअर बाजारात गुंतवल्यास त्याचा परतावा कैक पटीने अधिक मिळू शकतो. आजच्या तरुण पिढीने याकडे अधिक गांभीर्याने पाहावे. जर कमी वयात शेअर बाजारात गुंतवणूक सुरू केली तर वयाच्या ५०व्या वर्षी आपण एक मोठी रक्कम उभी करू शकतो आणि आपले पुढील जीवन अधिक सुखकर करू शकतो. यासाठी आपल्याकडे हवी चिकाटी, सातत्य, धीर आणि बाजारावरील विश्वास.
आजच्या तरुण पिढीसाठी बाजाराचे तंत्र ही विशेष लेखमाला सुरू करीत आहोत. शेअर बाजाराशी निगडीत अनेक संकल्पना - ज्याला आपण इंग्रजी भाषेत 'कन्सेप्ट' असे म्हणतो - त्याचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. हे ज्ञान आत्मसात करून शेअर बाजार हा अधिक व्यापक रीतीने समजून घ्यावा आणि त्याकडे सट्टा बाजार आणि केवळ श्रीमंतांचा बाजार असे न पाहता कमी वयातच गुंतवणूक सुरू करावी. अगदी सर्वसामान्य अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील गुंतवणूकदारानेसुद्धा याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे आणि आपला भविष्यातील 'फायनान्शिअल फ्रीडम' सुनिश्चित केला पाहिजे.
चला, आपण जाणून घेऊयात 'तंत्र शेअर बाजाराचे' आणि सुरू करूयात त्यातील दीर्घकालीन गुंतवणूक. विशेषतः तरुणांसाठी आणि मध्यम वयोगटातील सर्वांसाठी ही लेखमाला उपयुक्त ठरावी असा विश्वास वाटतो. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीम बाब असली तरी ती अभ्यासपूर्णच केल्यास जोखीम कमी हाऊ शकते असे सर्वांना आवर्जून सांगावेसे वाटते. शेअर बाजार एक अथांग समुद्र आहे. जितके शिकू तितके कमीच. परंतु शेअर बाजारातील काही महत्त्वाच्या संकल्पना आपण जणून घेणार आहोत पुढील काही भागांत. ज्यामुळे बाजार आपल्याला समजेल आणि त्यावरील विश्वासाने आपण त्यात गुंतवणूक करू शकाल. (क्रमशः)