Join us

पुढच्या 2 महिन्यांत कराच्या दृष्टीने काय काळजी घ्यावी?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 8:57 AM

वर्ष २०२२-२३ साठी दोन करप्रणाली आहेत. त्यापैकी कोणती स्वीकारावी?

अजित जोशी

अनेक वर्ष आपल्याला ठाऊक असलेल्या करप्रणालीत जुने दर लागू होतात आणि अनेक सवलती मिळतात. मात्र, २०२० पासून सरकारने आणलेल्या पर्यायी पद्धतीत काही सवलती रद्द होतात आणि त्याबदली कर कमी द्यावे लागतात. तुम्ही कोणत्या सवलतींचा फायदा घेता आहात, यावरून कोणती प्रणाली स्वीकारावी, हे ठरवता येईल. आजची सावधगिरी ही उद्याच्या त्रासापेक्षा फायद्यात असते. त्यामुळे ‘या’ गोष्टी ३१ जानेवारीपर्यंत करायचं टार्गेट ठेवा...!

मार्चला आर्थिक वर्ष संपतं आणि मग आपण सरत्या वर्षांचा रिटर्न भरू शकता, पण त्यावेळेला किमान त्रास आणि कमीतकमी खर्च व्हायचा असेल तर खालील गोष्टींची काळजी आत्ताच घ्यावी...

- ऑफिसच्या एच. आर. विभागाने मागितलेली कागदपत्रे ताबडतोब द्यावी.

- त्यांनी योग्य तो हिशेब केलेला आहे ना, हे तपासून घ्यावे. तो योग्य नसल्यास तो आत्ताच निदर्शनास आणून द्यावा.

- व्याज किंवा मिळणारं घरभाडं यांचा हिशेब एच. आर. विभागाला द्यावा. म्हणजे ते योग्य तो टीडीएस करतील. त्यांना द्यायचा नसेल, तर आपण त्यावरच्या टॅक्सचं वर्किंग करून आगाऊ कर भरून टाकावा.

- आत्तापर्यंत ज्यांनी आपला कर कापल्याचा दावा केलेला आहे, त्यांनी तो आपल्या नावाने भरला का नाही हे आयकर खात्याच्या साईटवरील आपल्या लॉगिनमध्ये जाऊन तपासून घ्यावं.

- याच साईटवर खात्याकडे असलेल्या आपल्या वर्षभरातल्या सगळ्या व्यवहारांचा हिशेब मिळतो. तो पाहून त्यात काही चूक/उणीव नाही ना, याची खात्री करावी.

>> बचत व्याजावर १० हजार रुपयांची वजावट (ज्येष्ठ नागरिकांना ती एफडीच्या व्याजावर ५० हजार रुपये मिळते) असते. भाड्यावर न दिलेल्या घरासाठी जर कर्ज घेतलं असेल, तर त्याचं व्याज दोन लाखांपर्यंत इतर उत्पन्नातून कमी करून दाखवता येतं. प्रॉव्हिडंट फंड, एलआयसी वगैरे काही गुंतवणुका केल्या किंवा मुलांच्या शुल्कामुळे एकूण उत्पन्नातून १,५०,००० रुपये कमी करता येतात.

>> घरभाड्याच्या भत्त्यापैकी किंवा नोकरीत मिळणाऱ्या इतर भत्त्यांपैकी काही भाग करमुक्त असतो. यासारख्या अनेक महत्त्वाच्या सवलतींचा फायदा नव्या प्रणालीत मिळत नाही. म्हणूनच आपल्याला कोणत्या सवलती मिळवता येतात यावरून प्रणाली निवडावी. आत्ता योग्य महिना आहे, तेव्हा तज्ज्ञांना दाखवून आपली प्रणाली ठरवावी आणि आपल्या एम्प्लॉयरला ती सांगावी म्हणजे अधिक-उणे टीडीएस होणार नाही.

अजित जोशी, चार्टर्ड अकाउंटंट

टॅग्स :इन्कम टॅक्स