करनीती भाग २२१ - सी. ए. उमेश शर्मा
अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, या वर्र्षी अर्थसंकल्पात शेअर्सवरील लाँग टर्म कॅपिटल गेनमध्ये काही बदल करण्यात आले, तर ते बदल कोणते ?
कृष्ण (काल्पनिक पात्र): अर्जुना, या वर्षी आयकरात थोडेसे बदल करण्यात आले. त्यातील एक महत्त्वाचा बदल म्हणजे शेअर्स, म्युच्युअल फंड इत्यादीवरील लाँग टर्म कॅपिटल गेन होय. म्हणजे १ एप्रिल २०१८ नंतर जर इक्विटी शेअर्स, इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंड यांची विक्री केली आणि नफा १ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर अतिरिक्त रकमेवर १० टक्के आयकर भरावा लागेल. वास्तविक नफ्याची रक्कम ठरविण्यासाठी विक्री किंमत आणि ३१ जानेवारी २०१८ रोजी असलेले बाजारमूल्य विचारात घ्यावे.
अर्जुन : कृष्णा, आतापर्यंत शेअर्स, म्युच्युअल फंड इत्यादीसाठी काय तरतुदी होत्या?
कृष्ण : अर्जुना, आतापर्यंत कलम १० (३८) अंतर्गत सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स भरलेल्या शेअर्सचा लाँग टर्म कॅपिटल गेन हा आयकरातून करमुक्त होता. त्यामुळे आर्थिक मालमत्तेतील गुंतवणुकीची फेरफार होण्यास प्रोत्साहन मिळत होते. यामुळे कर महसुलीचाही खूप तोटा झाला. या सर्व गोष्टींमुळे लाँग टर्म कॅपिटल गेनवरील सूट काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
अर्जुन : कृष्णा, कोणत्या लाँग टर्म कॅपिटल गेनवर आयकर भरावा लागेल, याची उदाहरणासह माहिती सांग?
कृष्ण : अर्जुना, याचे खालीलप्रमाणे उदाहरणे देता येतील.
१) समजा तू ३१ जानेवारी १०१७ मध्ये शेअर्स किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केलेली आहे आणि गुंतवणुकीचे वास्तविक मूल्य रु. १,००,००० आहे. त्या शेअर्सचे बाजार मूल्य ३१ जानेवारी २०१८ रोजी १,३०,००० रुपये असेल आणि जर तू ३१ मार्च २०१८ च्या अगोदर २,५०,००० रुपयांमध्ये शेअर्स विकले, तर तुझा वास्तविक करपात्र लाभ हा १,५०,००० रुपये होईल, परंतु तू हे शेअर्स ३१ मार्च २०१८ च्या आधी विकले, म्हणून तुला लाभावर कर भरण्याची आवश्यकता नाही.
२) समजा, तू ३१ जानेवारी २०१७ मध्ये शेअर्स किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केलेली आहे आणि त्याचे मूल्य १,००,००० रुपये आहे. त्या शेअर्सचे बाजार मूल्य ३१ जानेवारी २०१८ रोजी १,३०,००० रुपये असेल आणि जर तू ते शेअर्स ३१ मार्च २०१८च्या नंतर कधीही विकले व त्याची विक्री किंमत समजा २,००,००० रुपये असेल, तर तुझा वास्तविक करपात्र लाभ हा ७०,००० रुपये (रु. २,००,००० (-) रु. १,३०,०००) होईल, परंतु नफा हा १ लाख रुपयांपेक्षा कमी आहे. त्यामुळे तुला त्यावर आयकर भरायची गरज नाही.
३) समजा, तू ३१ जानेवारी २०१७ मध्ये शेअर्स, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केलेली आहे आणि त्याचे मूल्य १,००,००० रुपये आहे. त्या शेअर्सचे बाजारमूल्य ३१ जानेवारी २०१८ रोजी रु. १,३०,००० असेल आणि जर तू ते शेअर्स ३१ मार्च २०१८च्या नंतर कधीही विकले व त्याची विक्री किंमत समजा, रु. ३,००,००० असेल, तर तुझा वास्तविक करपात्र लाभ हा १,७०,००० रुपये (३,००,००० रुपये वजा १,३०,००० रुपये) होईल, परंतु तुला फक्त ७०,००० रुपयांवरच (१,७०,०००-१,००,०००) आयकर भरावा लागेल. कारण कर हा अतिरिक्त रकमेवर लागणार आहे. म्हणून तुला ७०,००० रुपयांवर १० टक्के म्हणजेच ७,००० रुपये आयकर भरावा लागेल.
अर्जुन : कृष्णा, ३१ जानेवारी २०१८ चे शेअर्सचे बाजार मूल्य कसे काढावे ?
कृष्ण : अर्जुना, १) जर शेअर्स मान्यताप्राप्त स्टॉक एक्स्चेंजवर नोंदणीकृत असतील, तर ३१ जानेवारी २०१८ रोजी त्या शेअर्सचा व्यापार झाला असेल, तर त्या दिवशीचे सर्वोच्च मूल्य हे बाजार मूल्य म्हणून गृहीत धरावे. जर ३१ जानेवारी २०१८ ला त्या शेअर्सचा व्यापार झाला नसेल, तर ३१ जानेवारीच्या लगेच आधी जेव्हाही व्यापार झाला असेल, त्या दिवशीचे सर्वोच्च मूल्य हे बाजार मूल्य म्हणून गृहीत धरावे. २) जर शेअर्स मान्यताप्राप्त स्टॉक एक्स्चेंजवर नोंदणीकृत नसतील, तर ३१ जानेवारी २०१८ रोजी त्या शेअर्सचे जे निव्वळ मूल्य असेल, ते बाजार मूल्य म्हणून गृहीत धरावे.
अर्जुन : कृष्णा, करदात्याने यातून काय बोध घ्यावा ?
कृष्ण : अर्जुना, सर्वांनी नवीन अर्थसंकल्प लक्षात घेऊन कर भरावा. गुंतवणूकदारांनी ३१ जानेवारी २०१८ रोजीचे त्यांच्या शेअर्सचे बाजारमूल्य सांभाळून ठेवावे. कारण त्यावरूनच त्यांचे लाँग टर्म कॅपिटल गेनचे दायित्व निश्चित होईल.
शेअर मार्केटसाठी ३१ जानेवारी २०१८चे महत्त्व काय?
कृष्णा, या वर्र्षी अर्थसंकल्पात शेअर्सवरील लाँग टर्म कॅपिटल गेनमध्ये काही बदल करण्यात आले, तर ते बदल कोणते ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 02:18 AM2018-02-19T02:18:51+5:302018-02-19T02:18:57+5:30