Join us  

गॅरेजमधून झालेली सुरुवात, आज आहे जगातील सर्वात मोठी रिटेलर; पाहा Amazon च्या यशाची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2024 10:14 AM

Amazon Success Story : जेफ बेझोस यांनी ५ जुलै १९९४ रोजी वॉशिंग्टनमधील आपल्या गॅरेजमधून अ‍ॅमेझॉनची सुरुवात केली होती. आज ती जगातील मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. जाणून घ्या कसा आहे त्यांचा प्रवास.

जेफ बेझोस यांनी ५ जुलै १९९४ रोजी वॉशिंग्टनमधील आपल्या गॅरेजमधून अ‍ॅमेझॉनची सुरुवात केली होती. सुरुवातीला अ‍ॅमेझॉन फक्त पुस्तकांची विक्री करत असे. परंतु, हळूहळू त्यात इलेक्ट्रॉनिक्स, सॉफ्टवेअर, घरगुती वस्तू, खेळणी, दागिने आणि किराणा यासह इतर अनेक उत्पादनांचाही समावेश होऊ लागला. आज अ‍ॅमेझॉन जगातील सर्वात मोठी ऑनलाइन रिटेलर बनली आहे. कंपनीचं वार्षिक उत्पन्न शेकडो अब्ज डॉलर्स इतकं आहे.

ही १९९४ ची गोष्ट आहे. तेव्हा जेफ बेजोस डी. ई. शॉ अँड कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष होते. ऑनलाइन पुस्तक विक्रीचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्याच वर्षी ५ जुलै रोजी त्यांनी वॉशिंग्टनमधील सिएटल येथील आपल्या गॅरेजमधून याची सुरुवात केली. १९९५ मध्ये त्यांनी कंपनीचे नाव बदलून Amazon.com केलं. दहा लाख डॉलर्सपेक्षा जास्त विक्री करणारा हा पहिला मोठा ऑनलाइन रिटेलर ठरला होता.

बनली सर्वात व्हॅल्यूएबल कंपनी

१९९७ मध्ये अ‍ॅमेझॉननं आपला पहिला पब्लिक स्टॉक जारी केला. टेक्नॉलॉजी बबलदरम्यान ती झपाट्यानं वाढली आणि जगातील सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी एक बनली. त्यानंतर १९९८ मध्ये कंपनीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार होऊ लागला. कंपनीनं ब्रिटन आणि जर्मनीमध्ये वेबसाईट लाँच केल्या. २००२ मध्ये अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेस (एडब्ल्यूएस) सुरू करण्यात आली, जी क्लाऊड कॉम्प्युटिंग सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. क्लाऊड कॉम्प्युटिंग उद्योगातही कंपनी अग्रेसर झाली.

२०१७ मध्ये अ‍ॅमेझॉनने किराणा स्टोर Whole Foods Market विकत घेतलं. किराणा उद्योगातील ती एक मोठी कंपनी झाली. २०१९ मध्ये जेफ बेजोस यांनी सीईओपदाचा राजीनामा दिला आणि कार्यकारी अध्यक्ष बनले. अँडी जेसी यांची नवे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली. आज अ‍ॅमेझॉन जगातील सर्वात मोठी ऑनलाइन रिटेलर आहे. त्यांचं वार्षिक उत्पन्न शेकडो अब्ज डॉलर्समध्ये आहे. ई-कॉमर्स, क्लाऊड कॉम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल अ‍ॅडव्हर्टायझिंगसह अनेक उद्योगांमध्ये अॅमेझॉन एक प्रमुख खेळाडू आहे. त्यातून लाखो लोकांना रोजगार मिळतो.यासोबतच जेफ बेझोस यांच्या अ‍ॅमेझॉनसोबतचा कारकिर्दीचा आलेखही वाढला. ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या शर्यतीत सामील झाले. त्यांची एकूण संपत्ती २५२ अब्ज डॉलर आहे. 

टॅग्स :व्यवसायअ‍ॅमेझॉन