RBI Rs 2000 Note Exchange: दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेकडे जमा करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेली ३० सप्टेंबर २०२३ ही अंतिम मुदत आहे. मात्र, अद्यापही २ हजार रुपयांची नोट जर बदलून घेतली नसेल, तर त्याचे पुढे काय होणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. १९ मे २०२३ रोजी, भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील सर्वांत मोठी चलनी नोट म्हणजे २ हजार रुपयांची नोट चलनातून काढून घेत असल्याची घोषणा केली होती.
चालू आठवड्यात अनंत चतुर्दशी दिवशी बँकांचे कामकाज सुरू राहिले. शुक्रवारी २९ सप्टेंबरला ईद ए-मिलादची राज्य सरकारने सार्वजनिक सुटी जाहीर केल्याने बँका बंद असतील. त्याला जोडून शनिवारी ३० सप्टेंबरला बँकांचा आर्थिक वर्षाचा सहामाही बंद असल्याने ग्राहकांना त्या दिवशी बँकांचे व्यवहार करता येणार नाहीत. त्या पुढे १ ऑक्टोबरला रविवार आणि २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीनिमित्त सार्वजनिक सुटी असल्याने सलग चार दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार आहे.
३१ ऑगस्टपर्यंत ९३ टक्के रिझर्व्ह बँकेकडे नोटा परत आल्या
मिळालेल्या आकडेवारीनुसार, ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत चलनातून परत मिळालेल्या दोन हजारांच्या नोटांचे एकूण मूल्य ३.३२ लाख कोटी आहे. परिणामी, ३१ ऑगस्ट २०२३ रोजी व्यवसायाच्या समाप्तीपर्यंत दोन हजारांच्या सुमारे २४ हजार कोटींच्या नोटा अजूनही चलनात होत्या. चलनात असलेल्या ९३ टक्के नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत आल्याचे सांगितले जात आहे. मात्र सलग सुट्यांमुळे बँकांचे कामकाज बंद राहणार असल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवार सायंकाळपर्यंत तरी रिझर्व्ह बँकेने नोटा बदलासाठी मुदतवाढ दिल्याचे जाहीर करण्यात आलेले नाही.
डेडलाइन वाढणार की नाही?
सर्वसाधारणपणे पॅनला आधारशी लिंक करणे असो किंवा नॉमिनीचे नाव डीमॅटशी जोडणे असो, अशा अर्थविषयक कामांसाठी मुदत वाढवून लोकांना दिलासा दिला जातो. पण जर आपण २ हजार रुपयांच्या नोटांबद्दल बोललो तर त्याची मुदत वाढवण्याची फारशी आशा दिसत नाही. त्यामागील कारण असे सांगितले जाते की, देशात सध्या असलेल्या २ हजार रुपयांच्या बहुतांश नोटा परत आल्या आहेत. मात्र, आरबीआय २ हजार रुपयांची नोट बदलून देण्यासाठी मुदत वाढवणार की दिलासा देण्यास नकार देणार, याबाबत स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. अंतिम मुदतीनंतर उरलेल्या पर्यायांबाबत रिझर्व्ह बँकेने कोणतेही भाष्य केलेले नाही. अशा परिस्थितीत, सध्या लोकांकडे फक्त बँका आणि आरबीआयच्या प्रादेशिक कार्यालयांद्वारे ते बदलण्याचा पर्याय आहे.