Join us  

अस्थिरतेचे सावट; तुमच्या गुंतवणुकीचे काय होणार? 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 8:26 AM

सलग तिसऱ्या सप्ताहामध्ये बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांनी वाढ दिली असली तरी मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये मात्र घट झाली.

प्रसाद गो. जोशी

बाजाराला निश्चित दिशा देणारे कोणतेही घटक या सप्ताहात नसल्याने शेअर बाजाराची नजर ही जगभरातील शेअर बाजारांमध्ये असलेले वातावरण आणि परकीय वित्त संस्थांची कामगिरी यावरच राहणार आहे. बाजारात या सप्ताहात होणार असलेली एफ ॲण्ड ओची सौदापूर्ती ही बाजार काही प्रमाणात अस्थिर ठेवणारी असली तरी अन्य घटकांचा प्रभाव बाजारावर राहणार आहे.

सलग तिसऱ्या सप्ताहामध्ये बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांनी वाढ दिली असली तरी मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये मात्र घट झाली. गत सप्ताहात बाजाराचा सेन्सेक्स ६१,००२.७० अंशांवर बंद झाला. निर्देशांकाने ओलांडलेला ६१ हजारांचा टप्पा हे या सप्ताहाचे वैशिष्ट्य मानावे लागेल. निफ्टी १७,९४४.२० अंशांवर बंद झाला आहे. जानेवारी महिन्यामध्ये किरकोळ महागाईच्या दरामध्ये वाढ झाली असून त्यामुळे बाजारात चिंतेचे वातावरण राहिले. त्याचाच परिणाम मिडकॅप आणि स्मॉलकॅप या कंपन्यांच्या समभागांची तुफान विक्री होऊन गुंतवणूकदारांनी नफा कमावला. 

परकीय वित्त संस्था लागल्या खरेदीलाभारतामधून पैसा काढून घेणाऱ्या परकीय वित्त संस्थांनी आपला रोख बदलला असून गत सप्ताहात या संस्थांनी भारतीय बाजारामध्ये गुंतवणूक केली आहे. या संस्थांनी गत सप्ताहामध्ये भारतीय शेअरमध्ये ७६०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. याआधीच्या सप्ताहात या संस्थांनी ३९२० कोटी रुपयांचे समभाग विकले होते. त्या पुन्हा अधिक नफ्यासाठी विक्री करण्याची शक्यताही आहे. सौदापूर्ती असल्याने ही शक्यता अधिक दिसते.

निर्देशांक वाढूनही भांडवलमूल्य घटलेबाजार वाढला की, बाजाराचे भांडवलमूल्य वाढते. असा सर्वसाधारण समज आहे. मात्र, गत सप्ताहामध्ये बाजाराचे प्रमुख निर्देशांक वाढूनही बाजाराचे भांडवलमूल्य घटलेले आहे. सप्ताहामध्ये बाजाराचे एकूण भांडवलमूल्य १ लाख ३२ हजार ३७०.५५ कोटी रुपयांची घट झाली आहे. सप्ताहाअखेर बाजाराचे एकूण भांडवलमूल्य २,६६,८६,९७६.३४ कोटी रुपयांवर गडगडले आहे.