RBI Policy: पुढील महिन्यात रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक पार पडणार आहे. रिझर्व्ह बँक येत्या पतधोरण समितीच्या बैठकीत व्याज दर स्थित ठेवण्याची शक्यता आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांनी यासंदर्भातील अंदाज व्यक्त केलाय. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह (US Federal Reserve) आणि युरोपियन सेंट्रल बँकेनं (European Central Bank) प्राईम रेटमध्ये वाढ केल्यानंतरही महागाई (Domestic Inflation) रिझर्व्ह बँकेच्या मर्यादेत आहे.
रिझर्व्ह बँकेनं गेल्या वर्षी मे महिन्यापासून व्याजदरात वाढ सुरू केलीहोती. परंतु या वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून रेपो दर ६.५ टक्क्यांवर स्थिर आहेत. एप्रिल आणि जून मध्ये गेल्या दोन पतधोरण समितीच्या बैठकांमध्ये यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
१० ऑगस्टला निर्णय
रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सहा सदस्यांच्या पतधोरण समितीची बैठक ८ ते १० ऑगस्ट दरम्यान होणार आहे. पतधोरण समितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची घोषणा १० ऑगस्ट रोजी गव्हर्नर शक्तिकांत दास करतील.
महागाई दर ५ टक्क्यांपेक्षा कमी
रिझर्व्ह बँक यावेळीही दर कायम ठेवेल अशी अपेक्षा आहे. यावेळीही महागाई दर ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. परंतु येत्या काही महिन्यात महागाई वाढण्यासोबत यामध्ये वाढीची जोखीम असेल, अशी प्रतिक्रिया बँक ऑफ बडोदाचे (Bank of Baroda) मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस यांनी दिली.