नवी दिल्ली : जेव्हा एखाद्या कंपनीत तुमची नोकरीसाठी नियुक्ती होते त्यावेळी तुम्हाला कंपनीकडून वेतन करारपत्र सादर केले जाते. त्यात तुम्हाला किती पगार मिळेल, तुमच्या पगारातून किती रक्कम जमा होईल, त्यात पीएफमधील रकमेचा वाटा किती असेल वगैरे मुद्दे असतात. अलीकडे व्हेरिएबल कॉम्पोनन्ट ही एक नवीन संज्ञा वापरली जाते. या रकान्यात तुम्हाला विशिष्ट रक्कम दर्शवली जाते. मात्र, ती रक्कम तेवढीच तुम्हाला मिळेल, याची खात्री नसते. म्हणूनच वेतनकरार करतेवेळी या कॉलमचा नीट विचार करावा. यामुळे तुमचा महिन्याकाठी हातात येणारा पगार वाढेल.
याची काळजी घ्या...
- हातात अधिक पगार येण्यासाठी कंपनीशी शक्य तितक्या प्रमाणावर वाटाघाटी करा.
- नोकरी मिळल्यानंतर सर्वात अगोदर शैक्षणिक कर्ज फेडा.
- प्रत्येक महिन्यात कमीत कमी १ हजार रुपये भविष्यासाठी बचत करा.
- गुंतवणूक अथवा कर बचतीसाठी नव्हे, तर आरोग्यासाठी आरोग्य विमा काढा.
- बाय नाऊ पे लेटर आणि क्रेडिट कार्डने ईएमआयवर खरेदी करणे टाळा.
आपत्कालीन निधी तयार करा
सर्वप्रथम, नोकरी मिळाल्यानंतर स्वतःसाठी ५ ते ६ महिन्यांचा आपत्कालीन निधी तयार करा. नोकरी अचानक गेल्यास किंवा इतर कोणत्याही आर्थिक आणीबाणीच्या बाबतीत हे पैसे खूप महत्त्वाचे ठरतात.
हुशारीने खर्च करा
नोकरीच्या सुरुवातीच्या महिन्यांत तुमचा खर्च कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. मासिक बजेट तयार करा. दर महिन्याला तुमचा खर्च निश्चित करा. तुमचा मासिक खर्च तुमच्या क्षमतेनुसार आणि कमाईनुसार असावा.
कर्जाची परतफेड
-जर तुम्ही कर्ज घेऊन शिक्षण घेतले असेल तर सर्वप्रथम शैक्षणिक कर्जाची परतफेड करा.
- तुम्हाला पुढील शिक्षण घ्यायचे असेल तर उच्च शिक्षणासाठी चांगल्या म्युच्युअल फंडांमध्ये एसआयपीद्वारे गुंतवणूक करा.
कमाईसह बचत
- नोकरी लागल्यानंतर बचतीची सवय व्हायला हवी.
- दरमहा किमान १००० रुपये तुमच्या भविष्यासाठी सुरक्षित ठेवा.
- मनी मॅनेजमेंट स्वतः शिका. निर्णय पालकांवर सोडू नका.