सध्या शार्क टँक इंडियाचा तिसरा सीझन सुरू आहे. यामध्ये जुन्या शार्कसह काही नव्या शार्क्सनंही एन्ट्री घेतलीये. यापैकीच एक नव्या शार्क म्हणजे एडलवाइस असेट्स मॅनेजमेंटच्या सीईओ राधिका गुप्ता. राधिका गुप्ता यांनी अनेक संकटांवर मात करत आपल्या मेहनतीच्या जोरावर इथवरचा पल्ला गाठला आहे. नुकतीच त्यांनी रणवीर अल्लाहबादिया याच्यासोबतच्या एका युट्यूब शो मध्ये अनेक प्रश्नांची मनमोकळेपणानं उत्तरं दिली. एखादा इंटरव्ह्यू घेताना आपण कोणता प्रश्न विचारतो आणि त्यातून आपल्याला त्या उमेदवाराबद्दल काय समजतं याबद्दल त्यांनी यावेळी सांगितलं.
"मी सर्वात सोपी मुलाखत घेते आणि जे नोकरीसाठी येतात त्यांना सर्वात सोपा एकच प्रश्न विचारते. मी त्यांना त्यांच्याबद्दल सांगण्यास सांगते. यातून मला त्यांच्याबद्दल बरंच काही समजून जातं. मला त्यातून त्या व्यक्तीचं पॅशन, कसा संवाद साधता, तुमचा फोकस कसा आहे, तुम्ही किती रिसर्च केलाय, अशा अनेक प्रश्नांची मला उत्तरं मिळतात आणि मी नंतरच पुढचा निर्णय घेते," असं राधिका गुप्ता म्हणाल्या.
"आपण सातत्यानं प्रगती केली पाहिजे याची एक इच्छाशक्ती असली पाहिजे. आम्ही एक मोठा ब्रँड आहोत किंवा अधिक पैसा मिळतो म्हणून लोक आमच्यासोबत जोडले जात नाहीत. तर ते आमच्यासोबत ग्रोथसाठी जॉईन करतात. आम्ही लोकांचे पैसे मॅनेज करतो आणि त्यात नैतिकता खूप महत्त्वाची असते. १.२ लाख कोटी आम्ही मॅनेज करतो आणि ते आमचे पैसे नाहीत, त्याची जबाबदारी आम्हाला देण्यात आलीये, त्यामुळे नैतिकता महत्त्वाची आहे," असंही त्या म्हणाल्या.
राधिका गुप्तांचा प्रवास
राधिका गुप्ता यांना आपल्या त्यांच्या प्रवासात अनेक अडथळे पार करावे लागले. मुलाखतीत ७ वेळा रिजेक्ट झाल्यानंतर त्यांचा धीर सुटला होता. वयाच्या २२ व्या वर्षी आत्महत्येचा विचार करणाऱ्या राधिका यांनी वयाच्या ३३ व्या वर्षी कोट्यवधींच्या कंपनीच्या सीईओ बनल्या. २२ वर्षांच्या राधिका डिप्रेशनमध्ये गेल्या. त्याच्या उपचारासाठी त्याला मानसोपचार तज्ज्ञांकडे दाखल करावं लागलं. जेव्हा त्यांना मॅकेन्झीमध्ये नोकरी मिळाली त्यानंतर त्यांना तिकडून सुट्टी देण्यात आली.
पहिली नोकरी मिळाल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास परत येऊ लागला. त्यानंतर राधिका भारतात परतल्या. वयाच्या २५ व्या वर्षी त्यांनी पती आणि मित्रासोबत स्वतःची असेट्स मॅनेजमेंट फर्म सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्वतःची कंपनी सुरू केली, जी नंतर एडलवाईस एमएफनं विकत घेतली. एडलवाईसनं राधिका यांची सीईओ म्हणून निवड केली. वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी राधिका सर्वात तरुण सीईओ बनल्या.