Join us

सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी सरकारची व्हॉट्सअ‍ॅपसोबत हातमिळवणी; काय आहे प्लॅन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 12:25 IST

online fraud : सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी आता सरकारच्या दूरसंचार विभागाने व्हॉट्सअ‍ॅपची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

online fraud : सायबर गुन्हेगारांनी सरकारच्याही नाकी नऊ आणले आहेत. वेगवेगळे उपाय करुनही आर्थिक फसवणुकीच्या घटना सुरुच आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि मोबाईलच्या माध्यमातून हे गुन्हे केले जात आहे. हे प्रकार रोखण्यासाठी सरकारने आता थेट व्हॉट्सअ‍ॅपशी हातमिळवणी केली आहे. ऑनलाइन फसवणूक आणि स्पॅम विरुद्ध सुरक्षा मोहीम राबवण्यासाठी दूरसंचार विभागाने हा निर्णय घेतला आहे. यामध्ये संशयित फसवे संदेश कसे ओळखावे? त्याबद्दल कुठे माहिती द्यावी? याची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवण्यात येणार आहे. अधिकृत निवेदनानुसार, दूरसंचार विभागाने ऑनलाइन फसवणूक आणि स्पॅम विरुद्ध मेटा सुरक्षा मोहीम 'घोटले से बचाओ' राबवण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपची मदत घेणार आहेत.

व्हॉट्सअ‍ॅपला सरकार माहिती पुरवणारनिवेदनानुसार, दूरसंचार साधनांचा (जसे की मोबाईल, सोशल मीडिया) गैरवापर करणाऱ्यांवर आता व्हॉट्सअ‍ॅप कारवाई करणार आहे. यासाठी डिजिटल इंटेलिजेंस प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपला माहिती पुरवणार आहे. दूरसंचार विभागाचा डिजिटल इंटेलिजेंस प्लॅटफॉर्म दूरसंचार संसाधनांच्या गैरवापराबद्दल बँका, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सी यांसारख्या ५५० संस्थांना गोपनीय माहितीची देवाणघेवाण करतो.

सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी सरकारचे प्रयत्नगेल्या काही वर्षांत देशात सायबर गुन्हे आणि ऑनलाइन घोटाळ्यांच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. लाखो लोक घोटाळेबाजांच्या आमिषाला बळी पडले. यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. विशेषत: आजकाल डिजिटल अटकेची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. ताज्या प्रकणात मुंबईतील एका ८६ वर्षी महिलेची २० कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातूनही अनेक सायबर गुन्हेगार व्हिडिओ, व्हॉईस कॉल आणि चॅटद्वारे वापरकर्त्यांना शिकार बनवत आहेत. अशा स्थितीत दूरसंचार विभागाची व्हॉट्सअ‍ॅपसोबतची ही भागीदारी डिजिटल गुन्ह्यांना मोठ्या प्रमाणात आळा घालू शकते. 

टॅग्स :सायबर क्राइमव्हॉट्सअ‍ॅपसोशल मीडिया