नवी दिल्ली : चॅटिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप वापरकर्त्यांची गोपनीयता आणखी सुरक्षित करण्यासाठी विना मोबाइल क्रमांकाची सेवा देणाऱ्या एका फिचरवर काम करीत आहे. मोबाइल क्रमांक सामायिक न करताही संदेशांची देवाण-घेवाण यातून शक्य होईल.
व्हॉट्सॲपवरील संवादासाठी अनेकदा अज्ञात व्यक्तींचा क्रमांक सेव्ह करावा लागतो. नवे फिचर आल्यानंतर असे करण्याची गरज राहणार नाही. मोबाइल फोन क्रमांकाशिवायच व्यक्तीशी संवाद साधता येईल. ‘वॉबेटाइन्फो’वर देण्यात आलेल्या माहितीनुसार, सध्या या फिचरच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. त्यास बीटा डेव्हलपर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
कसे चालते फिचर?
नव्या फिचरद्वारे वापरकर्त्यास नाव, क्रमांक आणि युजरनेम अशा ३ पद्धतीने सर्च करण्याचा पर्याय मिळेल. त्यामुळे विना क्रमांकाद्वारेच संदेश पाठवता येईल. वापरकर्त्याचा मोबाइल क्रमांक उघड होणार नाही. सध्या टेलिग्राम या पद्धतीने काम करते. नवे फिचर आल्यानंतर टेलिग्रामच्या पद्धतीनेच व्हॉटसॲपही काम करेल.