नवी दिल्ली : सध्याच्या महागाईत सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे, कारण गव्हाच्या दरात (Wheat Prices) घसरण होण्याची होऊ शकते असे म्हटले जात आहे. व्यापार जगत आणि बाजारातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खुल्या बाजारात 30 लाख टन गहू विकण्याच्या सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे गहू आणि गव्हाच्या पिठाच्या किमती 4 ते 6 रुपयांनी कमी होऊ शकतात.
बिझनेस स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार, गहू आणि गव्हाच्या पिठाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने बुधवारी आपल्या बफर स्टॉकमधून 30 लाख टन गहू खुल्या बाजारात विकण्याची घोषणा केली. हा गहू भारतीय अन्न महामंडळ (FCI) मार्फत पुढील 2 महिन्यांत विविध माध्यमांतून विकला जाईल. याचबरोबर, हे गव्हाचे पीठ गिरणी मालकांना ई-लिलावाद्वारे विकले जाणार आहे. तसेच, गहू दळून पीठ बनवतील आणि ते कमाल किरकोळ किमतीत (MRP) लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय अन्न महामंडळ सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्स, सहकारी संस्था आणि इतर संस्थांना 23.50 रुपये प्रति किलो दराने गहू विकेल.
गव्हाच्या किमतींमध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता मर्यादित दिसते आणि 2023-24 (एप्रिल ते मार्च) साठी किमती 21.25 रुपये प्रति किलो या किमान आधारभूत किमतीच्या (MSP) वर राहतील. केंद्र सरकार 2023-24 साठी किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्त बोनस जाहीर करत नाही, तोपर्यंत नवीन मार्केटिंग हंगामात स्टॉक पुन्हा भरणे केंद्राचे कार्य कठीण होऊ शकते असे बाजार सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, एकदा नवीन गव्हाचे पीक बाजारात येण्यास सुरुवात झाली की, उत्पादन चांगले असल्यास, मध्य प्रदेश वगळता सर्व उत्पादक राज्यांमध्ये किंमती किमान आधारभूत किमतीच्या खाली येऊ शकतात, असे अन्य लोकांचे म्हणणे आहे. तर देशातील प्रमुख शहरांमध्ये बुधवारी गव्हाची सरासरी किंमत 33.43 रुपये प्रति किलो होती, तर गेल्या वर्षी याच काळात ही किंमत 28.24 रुपये प्रति किलो होती. त्याचवेळी, यावर्षी गव्हाच्या पिठाचा सरासरी भाव 37.95 रुपये प्रतिकिलो इतका नोंदवला गेला असून गेल्या वर्षी हा दर 31.41 रुपये प्रतिकिलो होता.