नवी दिल्ली : वाढत्या महागाईने हैराण झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार एकीकडे आयातीवरील शुल्क कमी करत असताना दुसरीकडे निर्यात होणाऱ्या वस्तूंवर निर्यात शुल्क वाढवत आहे. तसेच निर्यात कमी करण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. गहू निर्यातीवर बंदी घातल्यानंतर आता केंद्र सरकार तांदूळ निर्यातीवर बंदी घालण्याचा विचार करत आहे. मात्र हा निर्णय कधी घेण्यात येईल हे सांगण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला.
अहवालानुसार, देशांतर्गत बाजारामध्ये तांदूळ पुरेशा प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी आणि किंमत कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा सल्ला पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) तयार करण्यात आलेल्या समितीने दिला आहे. पीएमओची ही समिती प्रत्येक वस्तूची किंमत नियंत्रणात ठेवण्यासाठी अभ्यास करत आहे.
जगातील दुसरा सर्वात मोठा तांदूळ उत्पादक
n भारत जगातील दुसरा सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश आहे. चीननंतर भारतात सर्वाधिक तांदळाचे उत्पादन घेतले जाते.
n भारताने वर्ष २०२१-२२ मध्ये जगभरात १५० देशांना तांदूळ निर्यात केला होता.
n भारतात किरकोळ महागाई दर एप्रिलमध्ये ८ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्याने महागाई कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
केंद्राचा महागाईविरोधात मोर्चा
१४ फेब्रुवारी : पाम तेलावरील आयात शुल्क हटवले
३० मार्च : तूर, उडीद डाळीवर उत्पादन शुल्क रद्द
१३ एप्रिल : कापूस आयातीवरील आयात शुल्क हटवले
१२ मे : इंधनाच्या किमती वाढल्याने हवाई प्रवास भाडे वाढवले
१३ मे : गहू निर्यातीवर बंदी
२१ मे : पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात
२४ मे : सोयाबीन आणि सूर्यफूल तेल आयातमुक्त
आणखी ५ वस्तूंवर येऊ शकते बंदी
तांदळाच्या किमतीमध्ये जर थोडी जरी वाढ झाली तर तत्काळ निर्यातबंदीचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे समितीने अहवालात म्हटले आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, केंद्र सरकार ५ उत्पादनांवर बंदी घालण्याचा विचार करत आहे.
पुढे काय? कापूस निर्यात आणि कॉटन फ्यूचर्स ट्रेंडिंगवर बंदी घालू शकते केंद्र सरकार