नवी दिल्ली : ऑक्टोबर महिन्यात घाऊक आणि किरकोळ महागाई तसेच खाद्य महागाई तीन महिन्यांच्या नीचांकी स्तरावर घसरली असली तरी गहू, तांदूळ, भरड धान्य यांचा महागाई दर १०० टक्क्यांहून अधिक झाला आहे. गव्हाचा किरकोळ महागाई दर एप्रिल २०२२च्या ९.५९ टक्केच्या तुलनेत ॲाक्टोबरमध्ये दुप्पट होत १७.६१ टक्के झाला आहे, तर तांदळाचा महागाई दरही १०.२१ टक्क्यांवर पोहोचला आहे, जो यापूर्वी एप्रिलमध्ये ४ टक्के होता. भरड धान्याचा महागाई दर एप्रिलच्या ६ टक्क्यांवरून वाढत १२ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे रोजचे जेवण महाग झाले आहे. इतर अन्नधान्याच्या महागाई दरात मात्र घसरण झाली आहे.
गहू आणि तांदळाच्या किमतीत झालेली वाढ महागाईस कारणीभूत ठरत आहे, तर इतर अन्नधान्याची महागाई कमी झाली आहे. भरड धान्याचा सामान्य नागरिकांच्या रोजच्या आहारात मोठ्या प्रमाणात समावेश असतो. गरिबांचे बजेट यामुळे बिघडू शकते. मात्र, सरकारने याअगोदरच ८० कोटी नागरिकांसाठी मोफत अन्नधान्य योजना ३ महिन्यांसाठी वाढवून ३१ डिसेंबरपर्यंत केली आहे.
कापूस चकाकणारच...
- जागतिक बाजारात वाढलेल्या किमती आणि आवक कमी असल्याने भारतीय बाजारात कापसाच्या किमती कमी होण्याची शक्यता अतिशय कमी आहे.
- बाजारातील तज्ज्ञांनुसार, येत्या काळात कापसाच्या किमती ३५ हजार रुपये प्रतिगाठपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सध्या शेतकरी आणखी भाव वाढण्याच्या प्रतीक्षेत असल्याने आवक कमी आहे. यामुळे कापूस महागच राहणार आहे.
केंद्राचा गव्हाचा साठा कमी झाला
सरकारी गोदामांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत गव्हाचा साठा कमी होत चक्क अर्ध्यावर आला आहे. सरकारच्या गोदामांमध्ये गव्हाचा साठा यावेळी २.१ कोटी टन आहे, जो नोव्हेंबर २०२१मध्ये ४.२ कोटी टन होता. हे प्रमाण सध्या तब्बल ४२% कमी आहे.
किती वाढला महागाई दर?
एप्रिल ॲागस्ट
गहू ९.५९% १७.६१%
तांदूळ ०.४% १०.२१%
भरड धान्य ०.६% १२.५%
इतर अन्नधान्य ७.७९% ६.७७%
अन्न महागाई ७.०१% ८.३१%
२.१ कोटी टन गव्हाचा साठा सरकारकडे सध्या आहे, जो नोव्हेंबरमध्ये ४.२ कोटी टन होता. हा साठा ४२%नी कमी.
८-१० टक्क्यांनी गेल्या एका महिन्यात कॉटनचे भाव वाढले आहेत.
३५ हजार रुपये प्रतिगाठपर्यंत कापसाची किंमत जाण्याची शक्यता. एका गाठेत १७० किलो असतो कापूस.
३४४ लाख गाठ कॉटनचे यंदा देशभरात उत्पादन होण्याची शक्यता
२९% वाढली गव्हाची किरकोळ किंमत, तर तांदळाच्या किमतीत १६ टक्के वाढ.