नवी दिल्ली : काेराेनामुळे बेराेजगारीमध्ये वाढ झाली. ठप्प झालेली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी केंद्र सरकारने टप्प्याटप्प्याने अनलाॅकची पाऊले उचलली. शहरी भागात काहीसे दिलासादायक चित्र निर्माण झाले़ मात्र, ग्रामीण अर्थव्यवस्थेची चाके सुरू झालेली नाही. राेजगार हमी याेजनेच्या नाेंदणीमध्ये माेठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या ७ वर्षांपेक्षा या वर्षी अधिक जणांना राेजगार हमी याेजनेमध्ये काम मिळाले आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षात नाेव्हेंबरपर्यंत साडेसहा काेटी कुटुंबातून ९.४२ काेटी जणांना राेजगार हमी याेजनेचा लाभ मिळाला आहे. हा आतापर्यंतचा उच्चांकी आकडा आहे. राेजगार हमी याेजनेसाठी एप्रिल ते नाेव्हेंबर महिन्यापर्यंत ९६ टक्के ग्राम पंचायतींनी कामासाठी मागणी नाेंदविली आहे. एकूण २.६८ लाख ग्रामपंचायतींपैकी ९१८१ ग्रामपंचायतींनी कामाची शून्य मागणी नाेंदविली आहे. त्या तुलनेत गेल्या वर्षी कामाची शून्य मागणी असलेल्या ग्रामपंचायतींचा आकडा २ टक्क्यांनी अधिक हाेता. ग्रामीण अर्थव्यवस्था अजूनही रुळावर आलेली नसल्याचे या आकडेवारीतून दिसून येत आहे.
काेराेनामुळे लागलेल्या लाॅकडाऊननंतर शहरी भागातील मजूर गावाकडे परतले हाेते. त्यांना राेजगार हमी याेजनेने आधार दिला. अजूनही हजाराे मजुरांना शहरात राेजगार उपलब्ध न झाल्यामुळे ते गावाकडेच असून, राेजगार हमी याेजनेचा त्यांना आधार मिळत आहे; परंतु ग्रामीण अर्थव्यवस्था अजूनही बिकट अवस्थेतच आहे. राेजगार हमी याेजनेतून चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत ५३ हजार ५२२
काेटी रुपयांचा निधी पुरविण्यात आला आहे.
८२ टक्के अधिक संख्या
ऑक्टाेबरमध्ये सर्वाधिक १.९८ काेटी कुटुंबांची नाेंद रोहयोसाठी करण्यात आली हाेती. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा ८२ टक्क्यांनी अधिक आहे. तामिळनाडू, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यातून सर्वाधिक मागणी झाली आहे.