Join us

स्टार्टअप कधी जातात डेकाकॉर्न क्लबमध्ये? माहितीये कशी होते कंपन्यांची वर्गवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 2:48 PM

आयटी, विज्ञान, तंत्रज्ञानामुळे युवकांना उद्योगांची नवी क्षितिजे खुली झाली आहेत. अभिनव संकल्पनेच्या आधारे स्टार्टअप सुरू करणारे युवक आता रोजगार देऊ लागले आहेत.

आयटी, विज्ञान, तंत्रज्ञानामुळे युवकांना उद्योगांची नवी क्षितिजे खुली झाली आहेत. अभिनव संकल्पनेच्या आधारे स्टार्टअप सुरू करणारे युवक आता रोजगार देऊ लागले आहेत. जेव्हा एखाद्या स्टार्टअपमध्ये जोरदार वृद्धी होते, तेव्हा कंपनीचे मूल्यांकनही वाढते. एकूण भांडवलाच्या आधारे स्टार्टअपचे वर्गीकरण युनिकॉर्न, डेकाकॉर्न आणि हेक्टोकॉर्न... याप्रमाणे केले जाते. 

यातील देशात २०१६ मध्ये एकूण स्टार्टअप कंपन्यांची संख्या केवळ ४७१ इतकी होती आता ही संख्या १.२५ लाखांपर्यंत पोहोचली आहे. यातून १२ लाख तरुणांच्या हाताला काम मिळाले आहे. यातील ४५ टक्केपेक्षा अधिक स्टार्टअपचे नेतृत्व महिला करीत आहेत.  

अशी होते स्टार्टअप कंपन्यांची वर्गवारी 

सुनिकॉर्न : नव्याने सुरू केलेल्या किंवा वेगाने प्रगती करणाऱ्या स्टार्टअप लवकरच मूल्यांकनाचा १ अब्ज डॉलर्सचा (८,३०० कोटी रुपयांहून अधिक) टप्पा पार करण्याच्या मार्गावर असतात. ही क्षमता असलेल्या स्टार्टअपना सुनिकॉर्न असे म्हटले जाते. 

युनिकॉर्न : कोणत्याही स्टार्टअपची सुरुवात छोट्याशा भांडवलाच्या आधारे केली जाते. त्यांची एकूण लोकप्रियता वाढते आणि ग्राहकही वाढत जातात. जेव्हा स्टार्टअपचे मूल्यांकन म्हणजेच भांडवली मूल्य १ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक होते, तेव्हा तिला युनिकॉर्नचा दर्जा मिळतो. 

डेकाकॉर्न : युनिकॉर्नची व्यवसायवृद्धी होऊन सतत होणाऱ्या नफ्यामुळे मूल्यांकन १० अब्ज डॉलर्सपेक्षा होते, तेव्हा कंपनीला डेकाकॉर्नचा दर्जा दिला जातो.  

हेक्टोकॉर्न  

मोठ्या प्रमाणावर जगभर विस्तार वाढतो तेव्हा स्टार्टअपला होणाऱ्या नफ्यातही वाढ होते. जेव्हा मूल्यांकन १०० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक होते, तेव्हा स्टार्टअपला ‘हेक्टोकॉर्न’ हा दर्जा प्राप्त होतो. सर्वाधिक मूल्यांकनामुळे यांना ‘सुपरकॉर्न’ असेही संबोधले जाते.  

चीनची बाईटडान्स ही ४०० अब्ज डॉलर मूल्यांकन असलेली जगातील सर्वांत मोठी स्टार्टअप कंपनी आहे. भारतातील कोणत्याही कंपनीने अद्याप हा दर्जा प्राप्त केलेला नाही. ॲपल, गुगल, मायक्रोसॉफ्ट, फेसबुक, ओरॅकल, सिस्को या जगभर परिचित कंपन्या म्हणजेच हेक्टोकॉर्नची उदाहरणे आहेत.