प्रसाद गो. जोशी
गेल्या दीड महिन्यापासून सातत्याने विक्री करीत असलेल्या परकीय वित्तसंस्थांमुळे बाजारात जोरदार घसरण होत आहे. ही विक्री कधी थांबणार, याची वाट गुंतवणूकदार बघत आहेत. आगामी सप्ताहामध्ये परकीय वित्तसंस्थांची भूमिका, सेवा क्षेत्राचा पीएमआय, अमेरिकेतील बेरोजगारी व जपानच्या चलनवाढीची आकडेवारी यावर बाजाराची वाटचाल अवलंबून आहे.
गतसप्ताहात परकीय वित्तसंस्थांनी विक्री कायम ठेवल्याने भारतीय बाजार घसरला आहे. बाजाराचा संदेदनशील निर्देशांक १९०६.०१ अंशांनी घसरून ७७,५८०.३१ अंशांवर बंद झाला आहे. निफ्टीमध्येही बरीच घट झाल्याचे दिसून आले आहे. भारतामधील चलनवाढीच्या दरामध्ये झालेली वाढ ही बाजाराच्या घसरणीला अधिकच वेग देऊन गेल्याचे दिसून आले.
अमेरिकेच्या निवडणुकीनंतर डॉलर आणखी मजबूत झाल्याचा फटका भारताला बसला. डॉलर मजबूत झाल्याने खनिज तेल दरामध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याने भारताच्या व्यापारातील तूट आणखी वाढत आहे. यामुळेही परकीय वित्तसंस्थांच्या विक्रीमध्ये वाढ झाली असू शकेल.
निर्देशांकांमध्ये सुमारे १० टक्के घट
- यावर्षी २७ सप्टेंबर रोजी सेन्सेक्स आणि निफ्टीने सर्वोच्च उंची गाठली होती. या दिवशी सेन्सेक्स ८५,९७८.२५ अंशांवर, तर निफ्टी २६,२७७.३५ अंशांवर बंद झाला होता. गेल्या सुमारे दीड महिन्यांमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सुमारे १० टक्के घसरण झाली आहे.
- सेन्सेक्समध्ये आतापर्यंत ८३९७.९४ अंश म्हणजे ९.७६ टक्के कपात झाली आहे. तर निफ्टीही १०.४४ टक्के म्हणजेच २७४४.६५ अंशांनी खाली आला आहे.
- परकीय वित्तसंस्थांची जोरदार विक्री, कंपन्यांचे कमी आलेले तिमाही निकाल आणि बाजारामधील विविध कंपन्यांचे उच्च मूल्यांकन या कारणांमुळे ही घट झाली आहे.
वित्तसंस्थांनी काढले २२ हजार कोटी
गेल्या दीड महिन्यापासून बाजारामधून पैसा काढून घेत असलेल्या परकीय वित्तसंस्थांच्या धोरणामध्ये काही बदल दिसून आलेला नाही. गतसप्ताहातही यांनी विक्री केली आहे. नोव्हेंबरमध्ये संस्थांनी बाजारामधून २२,४२० कोटी काढून घेतले.
चीनच्या बाजारामधून मिळत असलेली जास्त वाढ व अमेरिकेत बॉण्डच्या व्याजाचे असलेले चांगले दर यामुळे संस्था भारतातून पैसे काढून ते चीन व अमेरिकेमध्ये गुंतवत आहेत. ऑक्टोबरमध्ये परकीय वित्तसंस्थांनी भारतामधून ९४०१७ कोटी रुपये काढून घेतले असून ही एका महिन्यात काढलेली सर्वोच्च रक्कम ठरली.