लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची तीन दिवसीय बैठक ६ ते ८ फेब्रुवारी रोजी होईल. या बैठकीत धोरणात्मक व्याजदरात वाढ होण्याची शक्यता नाही. त्यामुळे सर्व प्रकारच्या कर्जांचे व्याजदर तूर्त वाढणार नाहीत. मात्र, व्याजदरात कपातीसाठी नव्या आर्थिक वर्षाची वाट पाहावी लागू शकते.
अर्थतज्ज्ञांच्या मते, व्याजदर कपात आता या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीतच होण्याची शक्यता आहे. या पतधोरण आढाव्यात व्याज कपात शक्य नाही. याचे मुख्य कारण विदेश व्यापारातील अडथळे हे आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनेही व्याजदर कपात लगेचच होणार नसल्याचे संकेत दिले आहेत.
कपातीसाठी प्रतीक्षा कधीपर्यंत?
एसबीआय रिसर्चने जारी केलेल्या ‘इकोरॅप’ नामक अहवालात म्हटले आहे की, जून २०२४ मध्ये रिझर्व्ह बँकेकडून धोरणात्मक व्याजदरात कपात केली जाऊ शकते. ऑगस्ट २०२४ व्याजदर कपातीसाठी सर्वाधिक आदर्श वेळ असेल, असे दिसून येत आहे.