ऑनलाईन फूड मागविण्याची क्रेझ मोठ्या शहरांमध्ये सर्रास पाहायला मिळते. आता, लहान शहरांमध्येही फूड डिलिव्हरी कंपन्या पोहोचल्या आहेत. हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि फूट कॉर्नरशी टायअप करुन या कंपन्या आता महानगरांपासून ते नगरांपर्यंत गेल्या आहेत. त्यामुळेच, लोकांची गरज ओळखून कंपनीने मिळवलेलं यश कौतुकास्पद आहे. झोमॅटो ही या क्षेत्रातील नावाजलेली कंपनी. झोमॅटोचे फूड डिलिव्हरी बॉय आपणास बाईकवर दिसून येतात. मात्र, या कंपनीचे सीईओच जेव्हा फूड डिलिव्हरी बॉय बनतात. दिपंकर गोयल यांनी ३१ डिसेंबर रोजी स्वत: डिलिव्हरी बॉय बनून ग्राहकांच्या ऑर्डर घरी पोहोचवल्या आहेत.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि ३१ डिसेंबर साजरा करत सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सर्वांचाच उत्साह दिसून येत होता. मात्र, लोकांचा हा उत्साह द्विगुणीत करण्यासाठ हॉटेल इंडस्ट्रीज, फूड इंडस्ट्रीज कर्तव्य परायण बनल्याचं दिसून आलं. याचवेळी झोमॅटोचे सीईओ स्वत:च फूड डिलिव्हरीसाठी ऑफिसमधून बाहेर पडले अन् सर्वांनाच आश्चर्यचा धक्का बसला. डिलीव्हरीबॉय बनलेल्या गोयल यांना पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या. परंतु, ऑफिसमधील कर्मचारीही गोयल यांचा अनोखा अंदाज पाहून थक्क झाले. ऑफिसच्या कामातून थोडा वेळ ब्रेक घेऊन गोयल यांनी ही ऑर्डर पूर्ण केली. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी फोटोही शेअर केला आहे. ज्यामध्ये, ते झोमॅटोचा ड्रेस परिधान केलेले दिसून येतात.
गोयल यांची पहिली डिलिव्हरी झोमॅटो ऑफिससाठीच होती. त्यांनी ४ ऑर्डर स्वत: दिल्याची माहिती दिली. "आत्ता मी स्वतःहून काही ऑर्डर देणार आहे. तासाभरात परत यायला हवे. माझ्या पहिल्या ऑर्डरने मला झोमॅटो ऑफिसमध्ये परत आणले, असे ट्विट त्यांनी केले. दरम्यान, 31 डिसेंबरच्या दिवसात झोमॅटोने 20 लाख डिलिव्हरी ऑर्डर्सही पूर्ण केल्याची माहिती त्यांनी ट्विटरवरुन दिली आहे.