Anand Mahindra News: महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. अनेकदा ते आपली मतं किंवा अनेक बाबी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतात. आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक रंजक किस्सा शेअर केला आहे. हा किस्सा भारतात कॉफीशी संबंधित आहे. "अनपेक्षित ठिकाणी रहस्यांचा शोध घेणं. भारतात पहिल्यांदा कॉफीची झुडुपं जवळपास १६७० मध्ये कर्नाटकातील चिकमंगळुरू (Chikkamagaluru) या ठिकाणी लावण्यात आली होती," असं त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय.
हे काम बाबा बुदान नावाच्या संतांनी केलं होतं. येमेनमधून त्यांनी कॉफीची बियाणं आणली होती. यामुळे भारतातील कॉफीची संस्कृती कायमची बदलून गेली. बाबा बुदान यांच्या भेटीमुळे भारत आणि कॉफी यांचे प्रदीर्घ नातं सुरू झालं. चिकमंगळुरू हे कॉफी उत्पादनाचं महत्त्वाचं क्षेत्र बनलंय. आजही हे शहर आणि आजूबाजूच्या टेकड्या कॉफीच्या भव्य बागांसाठी ओळखल्या जातात. जगातील सर्वोत्तम कॉफी बीन्स येथे पिकविल्या जातात.
कुठून आलं Ghibli ॲनिमेशन, कोण आहेत त्याचे मालक? नेटवर्थ ऐकून अवाक् व्हाल
भारतात वाढतेय कॉफीची क्रेझ
भारतात चहा पिणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पण आता कॉफीही हळूहळू लोकप्रिय होऊ लागलीये. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, कॉफीचं सेवन वाढत आहे. विशेषत: कोरोना महासाथीनंतर इन्स्टंट कॉफीची मागणी खूप वाढलीये. तरुणांना ती सहज मिळते आणि ती स्वस्तही आहे. त्यामुळे आता कॉफीचे नवे फ्लेवर्स आणि मिक्स समोर येत आहेत.
भारताची कॉफी निर्यात
भारत आता कॉफी उत्पादनात जगात सातव्या क्रमांकावर आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये भारतानं १.२९ अब्ज डॉलर्सच्या कॉफीची निर्यात केली. २०२०-२१ मध्ये ती ७१९.४ दशलक्ष डॉलर्स होती. जानेवारी २०२५ च्या पहिल्या पंधरवड्यात भारतानं ९३०० टन कॉफीची निर्यात केली. इटली, बेल्जियम आणि रशिया हे भारतातील कॉफीचे सर्वात मोठे खरेदीदार आहेत.
भारतात सुमारे तीन चतुर्थांश कॉफी अरेबिका आणि रोबस्टा बीन्सपासून बनविली जाते. ते बहुतेक भाजल्याशिवाय निर्यात केले जातात. कॉफी उत्पादनात कर्नाटक आघाडीवर आहे. २०२२-२३ मध्ये २,४८,०२० मेट्रिक टन कॉफीचं उत्पादन झालं. त्या खालोखाल केरळ आणि तामिळनाडूचा क्रमांक लागतो. भारतातही कॉफीचा वापर वाढला आहे. २०१२ मध्ये तो ८४,००० टन होतं, तो २०२३ मध्ये वाढून ९१,००० टन झालाय.