अजय वाळिंबे, शेअर बाजार विश्लेषक
विड पश्चात भारतीय शेअर बाजाराने सातत्याने तेजी दाखवल्याने गेल्या तीन महिन्यांतील शेअर बाजारातील पडझड गुंतवणूकदारांना चिंतेत पाडणारी आहे. ८४,००० अंशांवर गेलेला मुंबई बाजाराचा निर्देशांक अवघ्या ८-१० दिवसांत दिवसात चार-पाच हजार अंशांनी खाली आला आहे. निर्देशांकातील ही घसरण केवळ १० टक्के असली तरी गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलियोची घसरण मात्र नक्कीच मोठी असणार. ह्या मोठ्या घसरणीमुळे नवख्या गुंतवणूकदारांच्या तोंडचे पाणी पळाले असून, आता नक्की काय करायचे, या विवंचनेत ते आहेत. कारण प्रत्येक पडझडीला खरेदी करावी आणि तेजीत विक्री करावी हा मंत्र माहिती असला तरी बाजार नक्की तळ कधी गाठणार आणि तेजी कधी सुरू होणार या बाबतीत सामान्य गुंतवणूकदार अनभिज्ञ आहेत.
सगळं काही आलबेल असताना, पतमापन संस्थांनी भारतीय अर्थव्यवस्थेला उत्तम मानांकन दिले असतानाही शेअर बाजारात अचानक घसरण झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात तब्बल १.५० लाख कोटी रुपयांचे शेअर्स विकून नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या १५ दिवसांतच परदेशी संस्थांनी २९,५३५ कोटी रुपयांची विक्री केली होती. विक्रीचा हा कल थांबेल तेव्हा बाजार थोडा सावरू शकेल.
पुढे काय?
भारतीय वित्तीय संस्था आणि म्युच्युअल फण्ड्स यांनी वेळोवेळी केलेल्या खरेदीमुळे शेअर बाजार सावरत असला तरी जोवर परदेशी वित्तीय संस्था विक्री थांबवत नाहीत, तोपर्यंत शेअर बाजारात मोठे हेलकावे चालूच राहतील.
जागतिक बाजारातील अशांतता, जसे की रशिया-युक्रेन युद्ध आणि त्याचे युरोपियन देशांवरचे परिणाम, इस्राइल-पॅलेस्टीन-इराण-सिरिया युद्ध आणि त्याचे कच्च्या तेलावर होणारे परिणाम, अमेरिकेचे चीन, भारत तसेच मेक्सिकोवर अपेक्षित असलेले निर्बंध, वाढता डॉलर आणि अर्थात बीटकॉइनला आलेली झळाळी या सगळ्यांचा परिणाम बाजारावर अपेक्षित आहेच.
त्याचबरोबर देशांतर्गत समस्याही सुटायला हव्यात. यामध्ये प्रामुख्याने चलनवाढीला अटकाव, मेक इन इंडिया तसेच निर्यातीला प्राधान्य आणि आयातीवर निर्बंध, पायाभूत सुविधांवर भर आणि परदेशी गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण महत्त्वाचे ठरेल. गेल्या दशकभरातील भारताची वाटचाल पाहता दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी प्रत्येक मंदीत खरेदी करणे हे फायद्याचेच ठरेल यात मात्र शंका नाही.
घसरणीची नेमकी कारणे काय असावीत?
बहुतेक कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल निराशाजनक किंवा अपेक्षेनुसार नाहीत.
मोठ्या शहरातून मंदावलेली खरेदी.
इलॉन मस्क यांच्या पाठिंब्याने निवडून आलेले अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय अनपेक्षित नसला तरीही त्यांच्या जाहीरनाम्याचे प्रत्यक्ष परिणाम जागतिक बाजारपेठेत काय होतील याबाबतीत अनिश्चितता आहे.
ढासळता रुपया आणि चीनने
केलेल्या आर्थिक सुधारणा.
चलनवाढीची भीती आणि
चढे व्याजदर.
छोट्या आणि पेनी स्टॉक्सचे
अभूतपूर्व वाढलेले भाव.
अदानी समूहावर सातत्याने होत असलेले आरोप आणि त्याचे निधी उभारणीवर होणारे परिणाम.
वरील सर्वच कारणांमुळे परदेशी वित्तीय संस्थांनी सातत्याने केलेली विक्री.