नवी दिल्ली : पूर्ण लसीकरण झाल्यानंतरही अनेक कंपन्या अजुनही कर्मचाऱ्यांना वर्क फ्राॅमचा पर्याय देत आहेत. नेसले, टाटा, गाेदरेज, डाबर यांच्यासह या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांनी पुढील दाेन महिन्यांसाठी ऑफिसला या किंवा घरातूनच काम करा, असा पर्याय दिला आहे.
आयटी क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी सप्टेंबर आणि ऑक्टाेबरपासून कर्मचाऱ्यांना कामावर बाेलावले आहे. मात्र, एफएमसीजी, स्टील इत्यादी क्षेत्रातील कंपन्यांनी अजूनही वर्क फ्राॅम हाेमचा पर्याय खुला ठेवला आहे. टाटा स्टील, जीई इंडिया, पेप्सीकाे या कंपन्यांमध्ये बहुतांश कर्मचारी घरातूनच काम करत आहेत. तर मारुती सुझुकी, मर्सिडीझ बेन्झ, आयटीसी यासारख्या कंपन्यांमध्ये राेस्टर सिस्टीमचे पालन करण्यात येत आहे. काेकाकाेला, ॲमवे, टाटा कन्झूमर, गाेदरेज कन्झूमर, नेसले इत्यादी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना पुढील दाेन महिने तरी पर्याय दिला आहे. घरातून काम करताना कामामध्ये लवचिकता आणता येते. त्याचा कार्यक्षमतेवर चांगला परिणाम हाेताे, असे बहुतांश कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. तर सध्या आम्हाला काेणतीही जाेखीम पत्कारायची नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनाच निर्णय घेऊ देणे, हेच याेग्य आहे, असे कंपन्यांच्या व्यवस्थापनाचे मत आहे.
या कंपनीत ४ दिवसांचा आठवडा
काही आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचे वर्क फ्राॅम हाेम आणखी दाेन ते तीन महिने लांबविले आहे. त्यातच एका कंपनीने कामासाठी चार दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला आहे. सायबरसुरक्षा क्षेत्रातील टीएसी सिक्युरिटी या कंपनीने आठवड्यातील ४ दिवस काम करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या ७ महिन्यांपासून याची अंमलबजावणी सुरू आहे. कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढण्यासाेबतच ते अधिक आनंदी आढळून आले तर या धाेरणाची मुंबई कायमस्वरुपी अंमलबजावणी करू, असे कंपनीने म्हटले आहे.