आर्टिफिशियल इंटेलिजन्सची (AI) जगभरात चर्चा होत आहे. ज्या कामासाठी एका माणसाला तासाभराचा वेळ लागतो ते काम एआय काही सेकंदात करणार असल्याचं म्हटलं जातंय. तर दुसरीकडे AI मुळे काही लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्याचंही काही लोक म्हणत आहेत. एआय मानवी मनाच्या पुढे विचार करतं, असंही बोललं जात आहे.
तंत्रज्ञानात सातत्यानं बदल होत असतो. दरम्यान, शेअर बाजारासाठी जर एआयची मदत घेतली तर त्यातून काय निष्कर्ष निघू शकतात हे पाहूया. चॅट जीपीटी आणि गुगल बार्ड शेअर यांच्याकडे शेअर बाजारात गुंतवणूकीसाठी ५ स्टॉक्स कोणते असतील याबद्दल विचारण्यात आली. लाँग टर्मसाठी कोणते पाच शे्अर्स आणि शॉर्ट टर्मसाठी कोणत्या पाच शेअर्समध्ये गुंतवणूक केली पाहिजे यासंदर्भात माहिती विचारण्यात आली.
ChatGPT नं काय सुचवलं?दरम्यान, चॅट जीपीटीला या संदर्भात विचारण्यात आल्यावर त्यानं कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूकीचा सल्ला देता येणार नसल्याचं म्हटलं. तसंच यासाठी आर्थिक सल्लागाराची मदत घेण्यास त्यानं सांगितलं. परंतु प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीवरून सामान्य माहिती देता येऊ शकते. त्याच्याकडे डिसेंबर २०२१ पर्यंतचा डेटा असल्याचं त्यानं सांगितलं. शॉर्ट टर्मसाठी टीसीएस, डॉ. रेड्डी, सन फार्मा, एचडीएफसी बँक किंवा आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचयुएल यासारख्या शेअर्सचा सल्ला त्यानं दिला.
तर लाँग टर्मसाठी टीसीएस किंवा इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, सन फार्मा, आणि एचयुएल सारखे स्टॉक्स सुचवले. याचाच अर्थ लाँग टर्म आणि शॉर्ट टर्मसाठी चॅट जीपीटीनं तेच स्टॉक्स सुचवले.
गुगल बार्डनं काय म्हटलं?चॅट जीपीटीप्रमाणे गुगल बार्डनंही विचारलेल्या प्रश्नावर डिस्क्लेमरसह पाच शेअर्स सूचवले. यामध्ये त्यानं अॅक्सिया कॉटनचा शेअर सूचवला. यासह त्यानं टेक्निकल चार्चही सादर केला. यानंतर अशोका बिल्डकॉन, एवीटी नॅचरल प्रोडक्ट्स, रेडिअंट कॅश, हरिओम पाईप इंडस्ट्रीजसारखे शेअर्स शॉर्ट टर्मसाठी सूचवले.
तर लाँग टर्मसाठी गुगल बार्डनं रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, इन्फोसिस, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स घेण्याचा सल्ला दिला. चॅट जीपीटी आणि गुगल बार्डनं शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घेण्याचंही आवाहन केलं.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)