नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था कोविड-१९ साथीच्या दुसऱ्या लाटेतून सावरताना व्यापक प्रमाणात वाढत असली तरी रोजगार बाजार अजूनही तणावातच आहे. विशेषत: शहरी भागात गुणवत्तापूर्ण नोकऱ्यांची मोठ्या प्रमाणात वानवा असल्याचे आढळून आले आहे.
विविध सर्वेक्षणे व डाटा यामधून समोर आलेल्या माहितीनुसार, अनेक क्षेत्रांत लोकांना कमी वेतनावर काम करावे लागत आहे. पहिली साथ येऊन गेल्यानंतर कृषी आणि बिगरकृषी अशा दोन्ही क्षेत्रांतील रोजगारांत सुधारणा झाली होती.
दुसऱ्या साथीनंतर कृषिक्षेत्रातील रोजगार वाढले असले तरी शहरी क्षेत्रातील रोजगारांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. शहरांत केवळ बांधकाम क्षेत्रातील रोजगाराची स्थिती सुधारली आहे.
सरकारच्या कालबद्ध श्रमशक्ती सर्वेक्षणानुसार, श्रमिकांना कमी उत्पादकता आणि कमी वेतनावर काम करण्यास भाग पाडले जात आहे. सीएमआयईच्या पिरॅमिड हाउसहोल्ड सर्व्हेनुसार, एकूण रोजगारात स्वयंरोजगाराचा वाटा सर्वाधिक ५३.५ टक्के झाला आहे. गेल्या वर्षी तो ५२.१ टक्के होता. त्यातही निम्न दर्जाच्या बिनपगारी घरगुती स्वयंरोजगाराचे प्रमाण १३.३ टक्क्यांवरून १५.९ टक्क्यांवर गेले आहे.
हा जुलै २०२१ पर्यंतचा कल आहे. जुलैमध्ये वेतनधारी रोजगारांची संख्या ७६.५ दशलक्ष असली तरी जूनच्या तुलनेत ती ३.२ दशलक्षांनी तसेच दुसऱ्या साथीच्या आधीच्या काळाच्या तुलनेत म्हणजेच जानेवारी-मार्च २०२१ च्या तुलनेत ती ३.६ दशलक्षांनी कमी आहे.
मध्यमवर्गाची संख्या घटली
अर्थतज्ज्ञांनी सांगितले की, वस्तू उत्पादन अजून कोविडपूर्व पातळीवर पोहोचलेले नाही. छोट्या आणि मध्यम उद्योगांनाही फटका बसलेला आहे. त्यामुळे गुणवत्तापूर्ण रोजगारांची वानवा दिसून येत आहे.
आर्थिक सांख्यिकी स्थायी समितीचे चेअरमन तथा भारताचे माजी मुख्य सांख्यिकीविद प्रणब सेन यांनी सांगितले की, मध्यमवर्गाची संख्या घटली आहे. ती पूर्ववत व्हायला थोडा अवधी लागेल.