देशात इंधनाचे दर गगनाला भिडलेले आहेत. यामुळे महागाईने कहर सुरु केला आहे. यातच आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर कमी होत असले तरी त्याचा फायदा काही ग्राहकांना मिळत नाहीय. वाढलेल्या वस्तूंच्या किंमती आणखी महाग करण्याचे काम जीएसटीने केले आहे. असे असताना आता जे कच्चे तेल ५० रुपये लीटरने आपण विकत घेत आहोत, ते अवघ्या १२ रुपयांना मिळेल, असा दावा एका प्रसिद्ध भारतीय उद्योगपतीने केला आहे.
डॉलरने रुपयाला ८० रुपयांवर आणून ठेवले आहे. कच्चे तेल १०० डॉलर प्रती बॅरल झाले आहे. ते काही दिवसांपूर्वी १५० च्या आसपास होते. रुपयाचे एवढे अवमुल्यन होणे यास कच्च्या तेलाच्या किंमती कारणीभूत असल्याचे केंद्राने म्हटले आहे. यावर वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी एक मोलाचा सल्ला दिला आहे. जर सरकारने तो मानला तर आयातीवर खर्च होणारा ७५ टक्के पैसा वाचणार आहे.
सरकारने जर संशोधन आणि उत्पादनामध्ये खासगी सेक्टरला अधिक वाव दिल्यास भारत स्वत:च कच्च्या तेलाचे उत्पादन करू शकेल. जे परदेशातून मागवत असलेल्या कच्च्या तेलापेक्षा तीन चतुर्थांश स्वस्त पडेल. मेटल आणि एनर्जी सेक्टरमध्ये व्यवसाय करणाऱ्या अनिल अग्रवाल यांनी यापूर्वीदेखील नैसर्गिक संसाधनांचा वापर वाढविण्यावर भर दिलेला आहे. देशाचे व्यापारी नुकसान सर्वकालिन उच्च्चांकावर असताना त्यांनी हा प्रस्ताव दिला आहे.
एका बॅरलमध्ये १५९ लीटर कच्चे तेल असते. यानुसार सध्याच्या बॅरलच्या किंमतीनुसार भारत प्रति लीटर कच्च्या तेलासाठी ५० रुपये मोजतो. अग्रवाल यांच्या दाव्यानुसार जर भारताने आपलेच उत्पादन सुरु केले तर हे बॅरल २५ डॉलरला पडेल. म्हणजेच एका लीटर कच्च्या तेलासाठी १२ रुपयांचा खर्च येईल. जर कच्चे तेल स्वस्त झाले तर त्याचा परिणाम पेट्रोल, डिझेलवर देखील होईल आणि ते देखील पन्नास रुपयांपेक्षा कमी दराने भारतीयांना मिळेल.
भारताला धातू आणि खनिजांचा प्रचंड साठा भेट म्हणून मिळाला आहे, पण यानंतरही आपण वर्षानुवर्षे आयातीची भरमसाठ बिले भरतो हे आश्चर्यकारक आहे. हे धातू अत्याधुनिक तंत्रज्ञान बनवण्याच्या दिशेने येत्या काही दशकांत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असेही अग्रवाल म्हणाले. जर देशांतर्गत उत्पादन चांगले असेल तर ते देशाला जागतिक संकटापासून संरक्षण देईल, उद्योजकतेला प्रोत्साहन देईल, मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करेल, असेही ते म्हणाले.