देशातील दिग्गज उद्योजक रतन टाटा यांचं ९ ऑक्टोबर रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं. त्यांची शेवटची इच्छा त्यांच्या सावत्र बहिणी शिरीन आणि डियाना जीजीभॉय पूर्ण करतील. रतन टाटा यांनी आपल्या इच्छापत्रात वकील डेरियस खंबाटा आणि त्यांचे निकटवर्तीय मेहली मिस्त्री यांची इच्छापत्राची अंमलबजावणी करण्यासाठी म्हणून नेमणूक केली होती. परंतु, इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, त्यांच्या सावत्र बहिणी शिरीन आणि डियना या देखील त्यांची अखेरची इच्छा पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. रतन टाटा यांच्यानंतर त्यांचे सावत्र बंधू नोएल टाटा यांच्याकडे टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
रतन टाटा यांना शिरीन जीजीभॉय आणि डियाना जीजीभॉय या दोन सावत्र बहिणी आहेत. रतन टाटा यांच्याशी त्यांचे संबंध खूप जवळचे होते. या दोन्ही बहिणी रतन टाटा यांची आई सोनू टाटा आणि सर जमशेदजी जहांगीरभाई यांच्या कन्या आहेत. रतन टाटा आपल्या लहान बहिणींवर खूप प्रेम करत असत. १९९० आणि २००० च्या दशकाच्या सुरुवातीला त्या रतन टाटा ट्रस्टच्या संचालक मंडळावर विश्वस्त होत्या. त्यांनी चार दशकांहून अधिक काळ गरीब, वृद्ध आणि दिव्यांगांना मदत करण्याचं काम केलं आहे.
अनेकांची केली मदत
एका रिपोर्टनुसार, १९९० ते २०११ या काळात डियाना यांनी डाउन सिंड्रोम आणि ऑटिझम असलेल्या अनेक रुग्णांना मदत केली. १९९४ ते २००१ या काळात त्या सर रतन टाटा ट्रस्टमध्ये प्रोग्राम अॅडव्हायझर होते. त्यांनी अनेक संस्थांमध्ये विश्वस्तपदही भूषवलं आहे. दिव्यांग प्रौढांना मदत करणारी अँकोरेज ही संस्था आणि महिला पदवीधरांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी मदत करणाऱ्या लेडी मेहेरबाई टाटा एज्युकेशन ट्रस्टमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सध्या त्या निराधार वृद्धांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या डिस्ट्रिक्ट बेनेव्हलंट सोसायटी ऑफ बॉम्बेच्या विश्वस्त आहेत.
प्रकाशझोतापासून दूर
शिरीन यांच्याबद्दल फारशी माहिती नाही. मात्र, रतन टाटा यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि अनुभवांनी त्यांचं नातं अधिक दृढ केलं. यामुळे त्या रतन टाटांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या. डेरियस खंबाटा आणि मेहली मिस्त्री यांच्याकडेही इच्छापत्राची अंमलबजावणी करण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
रतन टाटा यांनी आपल्या इच्छापत्रात वकील डेरियस खंबाटा आणि त्यांचे जवळचे मित्र, तसंच सहकारी मेहली मिस्त्री यांची इच्छापत्राची अंमलबजावणी म्हणून नेमणूक केली होती. त्याच्या सावत्र बहिणी शिरीन आणि डियानादेखील त्यांच्या शेवटच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मदत करतील.