नरेंद्र मोदी सरकारच्या तीसऱ्या टर्ममधील पहिला सर्वसाधारण अर्थसंकल्प निर्मला सीतारमन यांनी सादर केला आहे. यावेळी करण्यात आलेल्या घोषणांचा परिणाम मंगळवारी दिवसभर शेअर बाजारावर दिसून आला. या कालावधीत अनेक शेअर्सचे भाव कोसळले, तर काही शेअर्समध्ये जबरदस्त तेजीही दिसून आली. परिणामी देशातील टॉप-10 अब्जाधीशांच्या संपत्तीतही मोठा बदल झाला आहे. महत्वाचे म्हणजे, अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर, आशिया खंडातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या संपत्तीत घट झाली असून गौतम अदानी यांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत घट -अर्थसंकल्पाच्या दिवशी मुकेश अंबानी यांच्या रिलायंस इंडस्ट्रीजचा शेअर लाल निशानावर व्यवहार करत होता. मात्र, तो बुधवारी किंचित तेजीसह 2990.80 रुपयांवर व्यवहार करत होता. मात्र मंगळवारी झालेल्या घसरणीचा परिणाम मुकेश अंबानी यांच्या नेट वर्थवर अथवा संपत्तीवर झाला असून ती कमी झाली आहे. ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सनुसार, बुधवारी सायंकाळपर्यंत गेल्या 24 तासांत मुकेश आंबानी यांची संपत्ती 1.10 अब्ज डॉलर अथवा 9206 कोटी रुपयांनी घटून 112 अब्ज डॉलरवर आली होती.
गौतम अदानींना झाला फायदा - अर्थसंकल्पानंतर जगातील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये गणल्या जाणाऱ्या अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांना फायदा झाला आहे. एकाच दिवसात त्यांची संपत्ती 724 मिलियन डॉलर अर्थात 6000 कोटी रुपयांनी वाढली आहे. यानंतर त्यांची संपत्ती वाढून 102 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. अर्थसंकल्पाच्या दिवशी अदानी समूहाच्य बाजारातील लिस्टेड कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली होती. बुधवारचा विचार करता, अदानी समूहाचे अधिकांश शेअर हिरव्या निशानावर व्यवहार करताना दिसून आले.
या उद्योगपतींनाही झाला फायदा -अदानी यांच्याशिवाय, शापूर मिस्त्री, HCL चे शिव नादर, देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदल, दिलीप संघवी तसेच D-Mart चे राधाकिशन दमानी यांच्या संपत्तीतही वाढ झाली आहे. तसेच, Wipro चे फाउंडर अजीम प्रेमजी यांची संपत्ती घटली आहे.