Join us  

विवाहित असो की अविवाहित महिलेच्या प्रॉपर्टीवर पहिला हक्क कोणाचा? काय सांगतो कायदा?

By राहुल पुंडे | Published: October 14, 2024 12:08 PM

Property News: जर एखादी विवाहित किंवा अविवाहित स्त्रीचा मृत्यू झाला तर तिच्या मालमत्तेचा खरा वारसदार कोण? ह्याचे स्पष्टीकरण कायद्यात देण्यात आले आहे.

Property News: देशातील विविध न्यायालयांमध्ये सर्वाधिक दावे हे मालमत्तेशी संबंधित असल्याचे पाहायला मिळते. याच वादातून अनेकदा लोक आपल्या माणसांच्याही जीवावर उठतात. या वादाचं मूळ बहुतेकदा माहितीचा अभाव असते. त्यामुळे आपल्याला याबद्दल किमान माहिती असणे आवश्यक आहे. महिलांच्या संपत्तीविषयी देखील लोकांच्या मनात संभ्रम आहे. मृत्युपत्र न करता एखाद्या महिलेचा मृत्यू झाला तर तिच्या मालमत्तेवर नेमका कोणाचा अधिकार असतो?

देशातील मालमत्तेशी संबंधित बहुतेक नियम/कायदे हे धर्मानुसार वेगवेगळे आहेत. एकीकडे बौद्ध, जैन, शीख हे हिंदू कायद्यात येतात तर मुस्लिम धर्मियांसाठी वेगळा कायदा आहे. महिलांसाठी हिंदू उत्तराधिकार कायद्यातील अलीकडील सुधारणांमुळे मुली आणि पत्नींना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे, स्त्रियांसाठी इस्लामिक कायदे वेगळे आणि अधिक कठोर आहेत.

हिंदू महिलेच्या मालमत्तेचं विभाजनहिंदू उत्तराधिकार कायद्याच्या कलम 15(1) मध्ये महिला मालकाच्या मालमत्तेचे विभाजन कसे केले जाईल? याची माहिती आहे. या कलमांतर्गत, मालमत्तेसाठी वारसांच्या पसंतीचा आदेश देण्यात आला आहे. पसंतीच्या क्रमात महिलेचा मुलगा आणि मुलगी प्रथम स्थानावर आहे. दुसरे स्थान पतीच्या वारसाचे आहे. महिलेच्या आई आणि वडिलांचाही या संपत्तीवर हक्क असतो. पसंतीक्रमानुसार त्यांचे स्थान तिसरे आहे. वडिलांच्या वारसांचे स्थान यात चौथ्या क्रमांकावर आहे. तर पाचव्या स्थानी आईच्या वारसांचा समावेश आहे.

महिला अविवाहित असेल तर?भारतीय उत्तराधिकार कायदा, १९२५ च्या कलम ४२ आणि ४३ अन्वये, जर अविवाहित स्त्री मृत्यूपत्राशिवाय मरण पावली आणि तिचे वडील जिवंत असतील, तर वडिलांना संपत्तीचा वारसा मिळेल. जर वडिलांचाही मृत्यू झाला असेल तर अविवाहित महिलेची मालमत्ता आई आणि भावंडांमध्ये समान प्रमाणात विभागली जाईल.

मुस्लिम कायद्यात मालमत्तेचं विभाजन कसं आहे?मुस्लिम महिलांच्या बाबतीत हा नियम वेगळा आहे. मुस्लिम महिलेचा तिच्या मालमत्तेवर पूर्ण नियंत्रण असते. ती तिची मालमत्ता तिच्या आवडीच्या कोणालाही देऊ शकते. फक्त मृत्युपत्र करून मालमत्ता देताना काही अटी आहेत. मुस्लिम महिला फक्त तृतीयांश मालमत्ता कोणालाही देऊ शकते.

टॅग्स :बांधकाम उद्योगमहिला