Join us

झूम कॉलवरून ९०० जणांना कामावरून काढणारे CEO विशाल गर्ग आहेत तरी कोण? भारताशी आहे असं कनेक्शन 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2021 3:40 PM

Business News: एकाचवेळी ९०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याचा निर्णय सुनावणाऱ्या या सीईओंचे नाव आहे Vishal Garg. ९०० कर्मचाऱ्यांना कमी करणाऱ्या बेटर.कॉम या फर्मचे ते मुख्य कार्यकारी अधिकारी आहे.

न्यूयॉर्क - झूम मिटिंग सुरू असतानाच सीईओंनी कंपनीतील ९०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केल्याचे वृत्त सध्या व्हायरल होत आहे. दरम्यान, मिटिंग सुरू असतानाच एवढी कठोर घोषणा करणारे सीईओ कोण आहेत याचा शोध सध्या नेटिझन्सकडून घेतला जात आहे. त्यामुळे विशाल गर्ग या नावाच सर्चिंग वाढलं आहे. एकाचवेळी ९०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याचा निर्णय सुनावणाऱ्या या सीईओंचे नाव आहे विशाल गर्ग. ९०० कर्मचाऱ्यांना कमी करणाऱ्या बेटर.कॉम या फर्मचे ते मुख्य कार्यकारी अधिकारी आहे.

जर तुम्ही या कॉलमध्ये असाल तर तुम्ही या दुर्दैवी ग्रुपचा एक भाग आहात, या झूम कॉलमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं जात आहे, असे सांगत विशाल गर्ग यांनी ९०० कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा केली होती. दरम्यान, कंपनीने घेतलेल्या या कठोर निर्णयावर काही लोकांकडून टीका करण्यात येत आहे. तसेच विशाल गर्ग यांनी एक निनावी पोस्ट लिहून कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. हे कर्मचाऱ्या त्यांच्या कामाबाबत फारसे गंभीर नव्हते. त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे कंपनीचे ग्राहक कमी होऊन ते इतर कंपन्यांकडे वळले. तसेच केवळ दोन तास काम करून हे कर्मचारी आठ तास काम केल्याच आव आणत, त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

विशाल गर्ग हे बेटर.कॉम कंपनीचे फाऊंडर आणि सीईओ आहेत. ही कंपनी एक डिजिटल फर्स्ट होम ओनरशिप कंपनी आहे. गर्ग यांच्या लिंक्डइनवरच्या बायोडाटानुसार ते एक गुंतवणूक कंपनी वन झीरो कॅपिटलचे संस्थापक पार्टनरही आहेत. दरम्यान, विशाल गर्ग हे या वर्षाच्या सुरवातीला कोरोनाच्या साथी दरम्यान न्यूयॉर्कमधील शाळांमधील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या सुविधेसाठी १५ कोटी रुपयांची मदत केल्याने प्रसिद्धीच्या झोतात आले होते. या पैशांचा वापर गरीब मुलांसाठी आयपॅड, इंटरनेट, पुस्तके, ड्रेससारख्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी करण्यात आला होता.

विशाल गर्ग यांनी ९०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची घोषणा केली तेव्हाचा झूम कॉलवरील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरच झाला होता. तसेच विशाल गर्ग हे नाव चर्चेत आळे होते. हा व्हिडीओ त्या झूम कॉलमध्ये असलेल्या कुठल्यातरी कर्मचाऱ्याने शेअर करून नंतर व्हायरल केला असावा, अशी शक्यता आहे. दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांच्या केलेल्या कपातीसाठी बाजार, प्रॉडक्टिव्हिटी आणि प्रॉडक्शन कारणीभूत असल्याचे विशाल गर्ग यांनी सांगितले. 

टॅग्स :नोकरीकर्मचारीअमेरिकाव्यवसाय