Family Pension : कोणत्याही व्यक्तीसाठी आर्थिकदृष्ट्या स्थिर असणं खूप महत्वाचं असतं. अशा वेळी प्रत्येक व्यक्तीनं स्वत:साठी आणि आपल्या कुटुंबासाठी गुंतवणुकीची किंवा पेन्शनची आगाऊ व्यवस्था केली पाहिजे. पेन्शन मिळण्यासाठी भारत सरकारकडून अनेक योजना राबविल्या जातात. अशा काही योजना आहेत जिथे लोक गुंतवणूक करतात आणि स्वत:चं आणि आपल्या कुटुंबाचं भविष्य सुरक्षित करतात. यापैकीच एक योजना म्हणजे फॅमिली पेन्शन.
कोणत्याही संघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांना ६० वर्षांनंतर पेन्शन दिली जाते. लोकांच्या पगाराच्या डीएच्या १२ टक्के रक्कम दरमहा त्यांच्या पेन्शन फंडात जमा केली जाते आणि कंपनीही ती रक्कम जमा करते. जेव्हा एखादी व्यक्ती निवृत्त होते तेव्हा त्या व्यक्तीला ठराविक रक्कम म्हणून पेन्शन दिली जाते. परंतु कोणत्याही कारणास्तव त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर? अशा वेळी त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना पेन्शन दिली जाते. ही पेन्शन मिळण्यास पात्र असणारी व्यक्ती ती व्यक्ती असते जी एखाद्या कंपनीत १० वर्ष नोकरी करत असते.
फॅमिली पेन्शनचा हक्क कोणाला?
फॅमिली पेन्शन मिळण्यासाठी ईपीएफओने निकष निश्चित केले आहेत. या निकषानुसार एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी किंवा पतीला कौटुंबिक पेन्शन देण्याची तरतूद आहे. या तरतुदीत दोन मुलांनाही लाभ दिला जातो, मुलांच वय २५ वर्षांपेक्षा कमी असेल तर दोन्ही मुलांना पेन्शनच्या २५-२५ टक्के रक्कम दिली जाते. तर ५० टक्के वाटा पत्नीला दिला जातो.
व्यक्तीच्या मृत्यूनंतर जर त्याच्या जोडीदारानं दुसरं लग्न केलं तर, अशा परिस्थितीत मुलांना देण्यात येणारी पेन्शन ५० टक्क्यांवरून ७५ टक्क्यांपर्यंत वाढते. मूल शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असेल तर मुलांना आयुष्यभर पेन्शन दिली जाते. याशिवाय जर त्या व्यक्तीचं लग्न झालं नसेल तर मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या पालकांनाही पेन्शनचा लाभ मिळतो.